आज विवेकानंद असते तर त्यांच्यावरही गुंडांनी इंजिन ऑइल फेकलं असतं- थरुर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 02:00 PM2018-08-06T14:00:03+5:302018-08-06T14:00:45+5:30
झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
थिरुवनंतपूरम- 19 व्या शतकात जगभरात भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांबाबत जागृती करणारे आणि थोर विचारवंत स्वामी विवेकानंद आज असते तर त्यांच्यावरही गुंडांनी हल्ला केला असता असे विधान काँग्रेसचे नेते आणि थिरुवनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी केले आहे. झारखंडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा आणि अखिल भारीतय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर थरुर बोलत होते.
ज्याप्रमाणे अग्निवेश यांच्यावर हल्ला झाला तसाच आज स्वामी विवेकानंद असते तरी त्यांच्यावर या गुंडांनी हल्ला केला असता याची मला खात्री आहे असे थरुर म्हणाले. लोकांचा आदर करा, माणुसकी अधिक महत्त्वाची आहे असे विवेकानंदांनी आज सांगितले असते म्हणून या गुंडांनी इंजिन ऑइल त्यांच्यावर फेकलं असतं आणि अग्निवेश यांना रस्त्यात पाडलं तसंच त्यांच्याशीही वर्तन केलं असतं, अशा शब्दांमध्ये शशी थरूर यांनी अग्निवेश यांच्या हल्ल्याचा निषेध केला.
Video of my speech at this event today in Thiruvananthapuram! https://t.co/6djclHPOpVhttps://t.co/L8jXwAipv0
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 5, 2018
थरुर यांनी यावेळी गृहमंत्रालयाने जाहीर केलेली सांप्रदायिक हिंसाचाराची आकडेवारीही सांगितली. गेल्या चार वर्षांमध्ये सांप्रदायिक हिंसेच्या 2920 घटनांची नोंद झाली आहे. तसेच गायीच्या मुद्द्यावरून झालेल्या 70 खटल्यांपैकी 68 खटले भाजपाशासित राज्यांमध्ये नोंदले गेले आहेत.पंतप्रधान परदेशात गेल्यावर वेगवेगळे पोशाख घालतात मात्र ते हिरवा रंग मात्र परिधान करत नाहीत (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुस्लीम टोपी घालण्यास नकार दिला होता.) अशा शब्दांमध्ये थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.
दरम्यान स्वामी अग्निवेश यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यावर हल्ला होऊन 18 दिवस झाले तरिही झारखंड पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, या आठवड्यात आपण कधीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो असे अग्निवेश यांनी स्पष्ट केले.