हिंदू एकवटले नाही तर शहरं पाकिस्तानसारखी होतील, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 12:54 PM2019-01-09T12:54:04+5:302019-01-09T14:04:08+5:30
भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वाद निर्माण करताना दिसतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
जयपूर - भाजपामधील काही नेतेमंडळी अनेकदा बेताल विधान करुन नवनवीन वादांना आयते निमंत्रण देतात. भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांच्या यादीतील उदयपूरमधील भाजपाचे आमदार गुलाब चंद कटारिया यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 'जर हिंदू एकत्र आले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल', असे वादग्रस्त विधान गुलाब चंद कटारिया यांनी केले आहे. कटारिया यांच्या विधानामुळे नवीन वादाला फोडणी मिळू शकते.
उदयपूर येथील वल्लभ नगर ब्लॉकमधील एका गावामध्ये नवीन वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना गुलाब चंद कटारिया यांनी हे विवादित विधान केले आहे. याप्रकरणी कटारिया यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले जात आहे. कटारिया यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुलाब चंद कटारिया यांचं वादग्रस्त विधान
'जर हिंदू एकवटले नाहीत तर राजस्थानमधील कित्येक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. संधी मिळाल्यास जुन्या जयपूरला भेट द्या. या परिसरातील मंदिरांमध्ये असणाऱ्या मूर्तींच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आहेत, कारण येथील मंदिरातील मूर्तींची सेवा होत नाही. कोणत्याही धार्मिक रीतिरिवाजांचे येथे पालन होऊ शकत नाही, कारण येथील लोक मंदिर परिसरात मांस-हाडे फेकतात. या लोकांसोबत प्रत्येक दिवशी कोण वाद घालत बसेल?'
'पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत मुली'
गुलाब चंद कटारिया येथेच थांबले नाहीत. ते पुढे असंही म्हणाले की, ''आता लोकांना कुटुंब आणि तरुण मुलींचा बचाव करण्यासाठी घर सोडून जाव लागत आहे. तुम्हाला माहितीय लव्ह जिहाद काय आहे?. तुमच्या मुली पंक्चरवाल्यांसोबत पळून जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही चुका करत असाल तर यातून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही. यावर तुम्ही केवळ रडू शकता. धोका लक्षात घेऊन हिदूंनी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी एकत्र यायला हवं. आपण सर्व रामाचे पुत्र आहोत, जाती आणि धर्म विसरुन जा. रामच आपला धर्म आणि जात आहे. आपण जेव्हा मरतो, तेव्हाही 'राम-राम' म्हणतो. एकमेकांना भेटतो तेव्हाही 'राम-राम' याच शब्दाचा उपयोग करतो'', अशी वादग्रस्त विधानांची मालिकाच कटारिया यांनी सभेत सुरू ठेवली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांना चांगलंच फटकारलं होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले होते. भाजपाच्या नेत्यांनी मीडियाला सामोरं जाताना कमी बोललं पाहिजे. आमच्याजवळ भरपूर नेते आहेत आणि त्यातील काहींना पत्रकारांशी बोलण्यास फार आवडते. त्यामुळेच आम्हाला त्या उत्साही नेत्यांना दुसरं काम देण्याची आवश्यकता आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं आहे.