Nitin Gadkari : वाहतुकीचे नियम मोडल्यास FIR दाखल होणार, महामार्गावरील वेगाबाबत नवीन नियम येणार, नितीन गडकरींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 02:13 PM2021-12-23T14:13:24+5:302021-12-23T14:15:28+5:30
Nitin Gadkari : वाहतुकीचा नियम कोणी मोडला तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील आणि त्याआधारे एफआयआर दाखल होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
गाझियाबाद : वाहतुकीचे नियम (Traffic Rule) मोडणाऱ्यांची आता खैर नाही. केंद्रातील मोदी सरकार लवकरच गाड्यांच्या वेगाबाबत एक नवीन नियम बनवणार आहे, यामध्ये कोणी वाहतुकीचे नियम तोडताना आढळल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल होणार आहे. याबाबतची माहिती स्वत: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील डासना येथे एका कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, लवकरच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेवरील वेगाबाबत नवीन नियम करण्यात येणार आहे. वाहतुकीचा नियम कोणी मोडला तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील आणि त्याआधारे एफआयआर दाखल होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
डासना येथील एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्षाच्या इमारतीचे (Integrated Transportation System Control room Building) उद्घाटन करताना नितीन गडकरी म्हणाले की, लोकांना एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्षाचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान खूप महत्वाचे आहे. हे जपान आणि जायका यांच्या सहकार्याने बनवले आहे. दरम्यान, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावरील वाहतुकीशी संबंधित गतिविधींवर लक्ष ठेवण्यासाठी डासना येथील एकात्मिक वाहतूक व्यवस्था नियंत्रण कक्ष इमारत स्थापन करण्यात आली आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, पाच वर्षांत उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकन आणि युरोपियन दर्जाचे बनतील. दिल्ली ते लखनऊला जोडणाऱ्या एक्स्प्रेस वेचे 10 ते 12 दिवसांत भूमिपूजन केले जाईल. तसेच, ते म्हणाले की, हा एक्स्प्रेस वे लखनऊ ते कानपूर आणि कानपूर ते गाझियाबादला जोडला जाईल. त्यानंतर तो दिल्लीला जोडला जाईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत 10 ते 12 दिवसांत भूमिपूजन होणार आहे.
याचबरोबर, उत्तर प्रदेशमध्ये दीड कोटींहून अधिक काम केले असून आता दीड लाख कोटींची कामे सुरू आहेत, त्यापैकी 1 लाख कोटी मंजूर झाले आहेत. उत्तर प्रदेशात डबल इंजिनचे सरकार येणार आहे आणि मग आमची सर्व कामे होतील. यामुळे उत्तर प्रदेशात उद्योग येतील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, कानपूर ते लखनऊ एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर हे अंतर खूप कमी होईल आणि कानपूर ते लखनऊ किंवा लखनऊ ते कानपूर अवघ्या 40 मिनिटांत जाता येईल.