"इतर राष्ट्रप्रमुखांनी कोरोना लस घेतली, मग केंद्र सरकारमधील जबाबदार नेते मागे का?"
By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 03:27 PM2021-01-16T15:27:21+5:302021-01-16T15:27:55+5:30
काँग्रेस खासदार मनिष तिवारींचा कोरोना लसीकरणावर सवाल
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची आवश्यक असताना त्या न करता कोरोना लसींच्या वापरास परवानगी दिल्याचं काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी म्हटलं. कोरोना लस इतकी परिणामकारक आहे, मग सरकारमधील कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यानं ती का घेतली नाही, असा सवाल लोकसभेत आनंदपूर साहिबचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिवारींनी उपस्थित केला.
जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष ज्यो बायडन, उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये राणी एलिझाबेझ आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लस टोचून घेतली आहे. इतरही देशांच्या प्रमुखांनी कोरोना लस घेतली आहे. मग भारतात सरकारमधील कोणत्याही जबाबदार व्यक्तीनं लस का घेतली नाही? कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे ना? मग सरकारमधील व्यक्ती लस टोचून घेण्यात मागे का?, असे प्रश्न तिवारींनी विचारले.
If the vaccine is so safe & reliable & efficacy of the vaccine is beyond question then how is it that not a single functionary of the government has stepped forward to get themselves vaccinated as it has happened in other countries around the world?: Congress MP Manish Tewari https://t.co/M1PdUV96Xr
— ANI (@ANI) January 16, 2021
परवानगी देण्यात आलेल्या कोरोना लसींबद्दलही तिवारींनी सवाल उपस्थित केले आहेत. 'कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देणारी कोणतीही ठोस चौकट आपल्याकडे नाही. पण तरीही आपत्कालीन स्थितीत दोन लसींच्या मर्यादित वापरास परवानगी दिली गेली. कोवॅक्सिनची गोष्ट तर वेगळीच आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण न करताच कोवॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिली गेली आहे,' असं तिवारींनी म्हटलं आहे.