‘ऑक्सिजन’ अडवाल तर फासावर लटकवू; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 01:07 AM2021-04-25T01:07:44+5:302021-04-25T01:08:00+5:30
नवी दिल्ली : ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसाला आम्ही फासावर लटकवू, असा इशारा दिल्ली ...
नवी दिल्ली : ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसाला आम्ही फासावर लटकवू, असा इशारा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याबद्दल दिल्लीतील लहान-मोठ्या रुग्णालयांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.
त्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली मोठी वाढ ही लाट नव्हे तर त्सुनामीच आहे. दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले की, जर दिल्ली शहराला ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर या शहरातील परिस्थिती विलक्षण बिकट होऊ शकते. दररोज काही हजार नवे रुग्ण दिल्लीतील रुग्णालयांत दाखल होत आहे. हा प्रश्न गेल्या काही दिवसांत अधिक गंभीर बनला आहे. शुक्रवारी फक्त २९७ मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीला उपलब्ध झाला आहे. ऑक्सिजन तुटवड्याप्रकरणी सविस्तर उत्तराचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा अशी विनंती दिल्ली सरकारने उच्च न्यायालयाला केली.
ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या प्रक्रियेत कोणी अडथळा आणत असेल तर त्याचे एखादे उदाहरण आम्हाला सांगा, अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडे केली. अशा माणसाला आम्ही फासावर लटकवू, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील एका रुग्णालयात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील केजरीवाल सरकारला धारेवर धरले. कोरोना साथीच्या काळात दिल्ली सरकारने ऑक्सिजन उत्पादनाचे किती प्रकल्प सुरू केले असा सवालही न्यायालयाने केजरीवाल सरकारला विचारला.