सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला नोकरी - मायावती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:44 AM2019-04-06T07:44:58+5:302019-04-06T07:45:24+5:30
काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
नागपूर : देशाचा पंतप्रधान हा उत्तर प्रदेश ठरवत असतो. यावेळी बसपा-सपा युती पंतप्रधान ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असून बसपा सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब व्यक्तीला शासकीय व अशासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे केली. नागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेड क्वॉर्टरही नागपूर हेच आहे. देश नागपुरातूनच कंट्रोल होतोय. त्यांना संविधानाने हा देश चालवायचा नसून पुन्हा जुन्याच गुलामगिरीचे दिवस या देशात आणावयाचे आहेत, असा आरोपही मायावती यांनी केला.
काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. निवडणूक जाहीरनाम्यात ते मोठमोठ्या घोषणा करतात. परंतु त्यांच्या हवाहवाई घोषणा फोल ठरल्या आहेत. देशातील जनेतेने त्यांचा चांगलाच अनुभव घेतला आहे. काँग्रेसने आता ७२ हजार रुपये देण्याची व १२ हजार रुपये किमान वेतनाची घोषणा केली आहे, परंतु यामुळे काहीच होणार नाही. गरिबांना स्थायी मदत होणार नाही. आम्ही सत्तेवर आल्यास प्रत्येक गरिबाला शासकीय नोकरी देऊ , प्रत्येक हाताला काम देऊ, असेही मायावती यांनी स्पष्ट केले.