'बॉम्ब जंगलात पडले असते, तर पाकिस्ताननं त्वरित प्रत्युत्तर दिलं नसतं'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 01:22 PM2019-03-04T13:22:00+5:302019-03-04T13:23:11+5:30
हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर
कोईमतूर: एअर स्ट्राइकमध्ये कोणतंच नुकसान झालं नाही, दहशतवादी मारले गेले नाहीत, भारतीय हवाई दलाचे बॉम्ब जंगलात पडले, असे विविध दावे करणाऱ्या पाकिस्तानला हवाई दलानं मोजक्या शब्दात चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे बॉम्ब जंगलात जंगलात पडले असते, तर पाकिस्तानचे पंतप्रधान यावर बोलले नसते आणि त्यांच्याकडून प्रत्युत्तरादाखल कारवाईदेखील झाली नसती, असं उत्तर हवाई दलाचे प्रमुख बी. एस धनोआ यांनी पाकिस्तानला दिलं.
भारतीय हवाई दलाचा हल्ला अयशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आला. त्यासाठी बालाकोट, चकोठी आणि मुझफ्फराबाद येथील भागांचे फोटो दाखवण्यात आले. या भागात सारं काही आलबेल असल्याचं चित्र पाकिस्ताननं उभं केलं. त्यावर हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. एअर स्ट्राइकदरम्यान टाकलेले बॉम्ब जंगलात पडले, असा दावा त्यांनी (पाकिस्ताननं) केला. पण आमचे बॉम्ब जर जंगलात पडले असते, तर त्यांनी (पाकिस्तानी पंतप्रधान) प्रत्युत्तर दिलं नसतं. आम्ही लक्ष्यभेद केला. त्यामुळेच तर प्रतिहल्ला करण्यात आला, असं धनोआ म्हणाले.
Air Chief Marshal BS Dhanoa on air strikes: The target has been clearly amplified by FS in his statement. If we plan to hit the target, we hit the target, otherwise why would he (Pak PM) have responded, if we dropped bombs in the jungles why would he respond. pic.twitter.com/X4Y0Jdopr6
— ANI (@ANI) March 4, 2019
हवाई दलाच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले, यावरुन सध्या देशात राजकारण सुरू आहे. त्यामुळे याबद्दलचा प्रश्नदेखील धनोआ यांना विचारण्यात आला. त्यावर किती दहशतवादी मेले हे मोजणं आमचं काम नव्हे, आम्ही फक्त लक्ष्यभेद करतो, असं उत्तर धनोआ यांनी दिलं. आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणं आमचं काम नाही, असं धनुआ यांनी स्पष्ट केलं.
Air Chief Marshal BS Dhanoa on air strikes: IAF is not in a postilion to clarify the number of casualties. The government will clarify that. We don't count human casualties, we count what targets we have hit or not. pic.twitter.com/Ji3Z6JqReB
— ANI (@ANI) March 4, 2019
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. एअर स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात यावरुन राजकारण सुरू झालं आहे. विरोधी पक्षांकडून नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी होत होती. तर, पाकिस्ताकडूनही या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं होतं.