Amit Shah : "सत्यपाल मलिक म्हणाले ते सत्य असेल तर राज्यपाल असताना शांत का होते?" अमित शाहंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 01:13 PM2023-04-22T13:13:21+5:302023-04-22T13:14:09+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या आरोपावर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अलीकडेच पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. यावरून देशात राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. यावरून विरोधी पक्षानंही सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे. सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर त्यांना मिळालेल्या सीबीआय नोटीसबाबत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांच्यावर पलटवार केला. आमची साथ सोडल्यानंतरच त्यांना याची आठवण का येतेय? ज्यावेळी सत्तेत असतो त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. सत्यपाल मलिक यांच्या विश्वासार्हतेवर अमित शाह यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “जनतेनx याचा विचार करायला हवा. सत्यपाल मलिक यांचे म्हणणे योग्य असेल तर मग ते राज्यपाल असताना शांत का होते? सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असताना या विषयावर बोलायला हवे होते. हे सर्व सार्वजनिक चर्चेचा विषय नाहीत,” असं ते आरोपांवर बोलताना म्हणाले. अमित शाह इंडिया टुडेच्या राऊंड टेबल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केल.
जनतेनं मूल्यमापन करावं
“मी देशातील जनतेला नक्कीच सांगू इच्छितो की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं लपविण्यासारखं कोणतंही काम केलेलं नाही. आपल्या राजकीय स्वार्थासाठी कोणी आपल्यापेक्षा वेगळे काही बोलत असेल तर त्याचं मूल्यमापन माध्यमांनीही करावं, जनतेनंही करावे. तुम्ही पदावर नसताना आरोपाचे मूल्य आणि मूल्यमापन दोन्ही घसरतं,” असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
राजकारणात असं घडतं
जेव्हा तुम्ही सत्यपाल मलिक यांची राज्यपालपदी निवड केली तेव्हा तुम्ही चुकीची व्यक्ती निवडली असं तुम्हाला वाटलं नाही का? असा प्रश्न शाह यांना करण्यात आला. ते दीर्घकाळापासून पक्षासोबत आहेत. राजनाथ सिंह अध्यक्ष असताना ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते आणि आमच्या टीममध्येही होते. आता कोणी आपली भूमिका बदलतं, त्यावर आम्ही काय बोलू शकतो. राजकारणात असं घडत असतं,” असं त्यांनी नमूद केलं.