हिंमत असल्यास भन्साळींनी मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढावा, गिरिराज सिंह यांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 21:02 IST2018-01-28T21:01:19+5:302018-01-28T21:02:45+5:30
पद्मावत चित्रपट सिनेमागृहात झळकल्यानंतरही करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम आहे. अनेक सिनेमागृहांच्या बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळही केली.

हिंमत असल्यास भन्साळींनी मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढावा, गिरिराज सिंह यांचं आव्हान
नवी दिल्ली- पद्मावत चित्रपट सिनेमागृहात झळकल्यानंतरही करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम आहे. अनेक सिनेमागृहांच्या बाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळही केली. सिनेमाचा वाद शमेल असं वाटत असतानाच आता भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी त्या वादाला नव्यानं फोडणी दिली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी थेट संजय लीला भन्साळींना आव्हान देऊन टाकलंय.
हिंमत असल्यास संजय लीला भन्साळींनी मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढावा. तसेच त्या चित्रपटात पैगंबरांचे चरित्र दाखवावे, असं गिरिराज सिंह म्हणाले आहे. मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट काढून त्यांचे चरित्र दाखवण्याची कोणामध्ये हिंमत आहे का, असा सवालही त्यांनी नाव न घेता भन्साळींना विचारला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ज्यावेळी राजस्थानात पद्मावत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळी भन्साळींनी ते का बंद केले नाही ? गांधीजींवर चित्रपट काढून त्यात त्यांना कथ्थक आणि भांगडा करताना दाखवलं तर मी माफ करणार नाही, असं म्हणत त्यांनी भन्साळींवर निशाणा साधला आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच करणी सेनेनं देशातल्या अनेक भागांत आंदोलनं करत जाळपोळ केली. आंदोलनकर्त्यांनी गुरुग्राममध्ये स्कूलबसवर हल्ला केला होता. चित्रपटाने आतापर्यंत 83 कोटींचा गल्ला जमवला असून, चित्रपट समीक्षकांच्या मते हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा व्यवसाय करेल. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी करणी सेनेनं केली होती. भन्साळींनी चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीनं दाखवल्याचा करणी सेनेचा आरोप आहे.