आईची काळजी न घेतल्यास तुरुंगात रवानगी
By admin | Published: March 9, 2017 12:31 AM2017-03-09T00:31:52+5:302017-03-09T00:31:52+5:30
एकाकी वयोवृद्ध आईची काळजी न घेतल्यास तुरुंगात रवानगी केली जाईल, अशी ताकीद येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी कर्मचारी असलेल्या दोन भावांना दिली.
भोपाळ : एकाकी वयोवृद्ध आईची काळजी न घेतल्यास तुरुंगात रवानगी केली जाईल, अशी ताकीद येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सरकारी कर्मचारी असलेल्या दोन भावांना दिली.
८७ वर्षांच्या ग्यारसी साहू एकट्या राहतात. मुलांकडून मदत मिळावी यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे याचिका केली होती. दोन्ही मुले आपली काळजी घेत नसून, कफल्लक जीवन जगत आहोत. औषधे घेण्यासाठीही पैसे नाहीत, असे त्यांनी याचिकेत म्हटले होते. त्यांच्या याचिकेवर निवाडा करताना गोविंदपुरा भागाचे उपविभागीय अधिकारी मुकुल गुप्ता यांनी या महिलेची मुले राकेश साहू (५०) आणि नर्मदा साहू (५५) यांना आईला अन्न, औषधपाणी यासाठी दरमहा अनुक्रमे ८ हजार रुपये आणि ४ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
या महिलेची दोन्ही मुले सरकारी कर्मचारी आहेत. आईची काळजी घ्या, तिला खर्चासाठी दरमहा पैसे द्या. तिला एकटेपणा वाटू नये यासाठी कुटुंबीयांसह तिची भेट घ्या. असे न केल्यास तुमचा तुरुंगवास पक्का समजा,’ असे गुप्ता यांनी दोन्ही भावांना बजावले. (वृत्तसंस्था)