पत्नीला ‘काळी’ म्हणाल तर सावधान, घटस्फोटासाठी एवढेही कारण असेल पुरेसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 05:05 AM2018-05-31T05:05:57+5:302018-05-31T05:05:57+5:30
बायकोला ‘काळी’ म्हणून हिणवणार असाल, तर यापुढे सावध राहा. कारण हे एवढेही कारण घटस्फोट होण्यासाठी पुरसे ठरू शकते.
चंदीगड : बायकोला ‘काळी’ म्हणून हिणवणार असाल, तर यापुढे सावध राहा. कारण हे एवढेही कारण घटस्फोट होण्यासाठी पुरसे ठरू शकते. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका महिलेला याच कारणावरून घटस्फोट घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
महेंद्रगढ येथे राहणाऱ्या या महिलेचे पतीसोबत स्वयंपाकावरून भांडण झाले होते. त्यानंतर पतीने तिला इतरांसमोर रंगावरून हिणवले. अपमान केला. या कारणांवरून घटस्फोटाची मागणी तिने कोर्टात केली होती. त्यावर न्या. एमएमएस बेदी आणि न्या. गुरविंदर सिंह गिल यांच्या खंडपीठाने त्या महिलेला घटस्फोटासाठी परवानगी दिली.
निकालात कोर्ट म्हणाले,
ही शारीरिक क्रूरता
महिलेने न्यायालयात जे पुरावे सादर केले आहेत, त्यावरून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.
महिलेने आपल्याला क्रूर व वाईट वागणूक मिळत असल्याने सासरच्यांपासून वेगळं राहण्यास भाग पडलो असल्याचं सिद्ध केलं आहे.
प्रकरण सोडविण्याऐवजी त्याचं दुसरं
लग्न लावण्याचा कुटुंबाचा होता विचार
महिलेच्या वकिलाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पती तिचा छळ करत होता. महिलेला वारंवार ‘काळी’ असल्याचा टोमणा मारत अपमान केला जात होता.
स्वयंपाक व्यवस्थित न केल्यानेही हा टोमणा मारला जात होता. नोव्हेंबर २०१२ मध्ये महिलेने पतीचं घर सोडलं व माहेरी निघून आली.
या वेळी महिलेच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्यांशी संपर्क साधून चर्चा करून प्रकरण सोडवावं अशी विनंती केली. मात्र, त्यांना नकार देत मुलाचं दुसरं लग्न लावून देण्याची धमकी दिली, असं वकिलाने न्यायालयात सांगितलं.
या आधी कुटुंब न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली होती. मात्र, पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द करून घटस्फोटाची परवानगी दिली.