बीफ खाल्ल्याशिवाय जगता येत नसेल तर हरियाणात येऊ नका - आरोग्यमंत्री
By Admin | Published: February 10, 2016 09:30 AM2016-02-10T09:30:57+5:302016-02-10T09:34:48+5:30
बीफ खाल्ल्याशिवाय ज्यांना जगता येत नाही, अशा लोकांनी हरियाणात येऊ नये असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी केले आहे
>ऑनलाइन लोकमत
अंबाला, दि. १० - ' बीफ खाल्ल्याशिवाय ज्यांना जगता येत नाही, अशा लोकांनी हरियाणात येऊ नये' असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बीफ बॅनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
' जगातील अनेक देशांतील खाण्या-पिण्याच्या सवयी आपल्याला रुचत नसल्याने आपण (भारतीय) तेथे जात नाही. तसंच ज्या लोकांना बीफ खाल्ल्याशिवाय रहावतं नाही त्यांनीही हरिणायात येण्याची गरज नाही' असे वीज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हरियाणात येणा-या विदेशी पर्यटकांना सरकारतर्फे बीफ खाण्याचा विशेष परवाना देण्यात येईल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावर वीज यांनी हे रोखठोक उत्तर दिले. 'राज्यात गोसंरक्षण कायद्याची कडक अमलबजावणी होते, त्यामुळे इथे बीफ खाण्यास सक्त मनाई आहे' असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विदेशी पर्यटकांना बीफ खाण्यासाठी कोणताही परवाना वा सूट देण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
याच अनिल वीज यांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी करत त्यासाठी ऑनलाइन सर्व्हेही केला होता.