पुन्हा सत्तेवर आल्यास मोदी क्रूरकर्मा बनतील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:15 AM2019-04-05T08:15:01+5:302019-04-05T08:15:29+5:30
ममता बॅनर्जींचा घणाघाती आरोप
माथाभंग (प. बंगाल): आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता दिली तर मोदी क्रूरकर्मा हुकूमशहा होतील, अशी प्रखर टीका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.
प. बंगालच्या विकासात ममता आणि तृणमूल गतिरोधक आहेत, या मोदींच्या व्यक्तिगत टीकेला ‘यापुढे मी मोदींना पंतप्रधान न म्हणता ‘एक्स्पायरी बाबू (मुदत संपलेला नेता) म्हणेन, असा प्रतिटोला हाणला होता.
कूच बिहार येथील ग्सभेत तोच आक्रमकपणा कायम ठेवत ममता यांनी असाही आरोप केला की, आताही मोदींच्या लुटा, दंगली करा व ठार मारा याच तीन मुख्य घोषणा आहेत. पुन्हा सत्तेवर आल्यास ते राज्यघटना गुंडाळून ठेवतील आणि याहीपेक्षा क्रूरकर्मा हुकुमशहा बनून लोकशाहीला एकाधिकारशाहीत बदलून टाकतील. ममता असेही म्हणाल्या की, चहावाल्याला या देशाने पंतप्रधान केले, असे म्हणून मोदींनी सुरुवातीस भरपूर आत्मस्तुती करून घेतली. पण चहावाल्याला आश्वासने पूर्ण करणे जमले नाही, तेव्हा त्याने ‘मै मी चौकीदार’ ही लोकांना उल्लू बनविण्याची नवी टूम काढली आहे.
निर्वासित करण्याचा डाव
नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक हा भारतीय नागरिकांना निर्वासित करण्याचा भाजपचा कुटील डाव आहे, असा आरोप करून बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की, बंगालमध्ये ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’ (एनआरसी)सारखी मोहीम कधीही राबवू दिली जाणार नाही. देशात कोणी राहायचे व कोणी नाही, हे ठरविण्याचा मोदींना काहीही अधिकार नाही. (वृत्तसंस्था)