सत्तेत आल्यास ईशान्य भारतात बीफ बंदी नाही - भाजपा
By Admin | Published: March 27, 2017 10:10 PM2017-03-27T22:10:48+5:302017-03-27T22:10:48+5:30
एकीकडे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने बीफ बंदी करण्यावर जोर दिला होता तर आता ईशान्य भारतात...
>ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. 27 - एकीकडे उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने बीफ बंदी करण्यावर जोर दिला होता तर आता ईशान्य भारतात सत्तेत आल्यास असे कोणतेही पाऊल उचलणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
उत्तर प्रदेशात भाजपा सरकारकडून अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाईची देशभरात चर्चा सुरु असताना ईशान्य भारतात सत्तेत आल्यास आम्ही बीफ बंदी करणार नाही असं मेघालयमधील भाजपाचे सचिव डेव्हिड खर्सती यांनी म्हटलं आहे.मेघालय, मिझोरम, नागालॅंडमध्ये ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जास्त आहे तसेच येथे नागरिक मोठ्या प्रमाणात बीफ खातात.
आम्ही उत्तर प्रदेशाप्रमाणेच ईशान्य भारतातही कत्तलखान्यांविरोधात कारवाई करणार आहोत अशी चर्चा ईशान्य भारतात आहे, ‘हितसंबंध असलेल्या काही गटांकडून जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात आहेत,’ असे खर्सती म्हणाले. नागालँडमधील भाजपच्या नेत्यांकडूनदेखील पक्ष सत्तेत आल्यास गोहत्या बंदीचा निर्णय घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागालँड आणि ईशान्य भारतातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि या परिस्थितीची भाजपच्या केंद्रातील नेत्यांना कल्पना आहे,’ असे नागालँड भाजपचे प्रमुख विसासोली लहोंगू यांनी एका हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना स्पष्ट केले. मेघालय भाजपचे अध्यक्ष जे. व्ही. हलुना यांनीदेखील भाजप सत्तेत आल्यास गोहत्याबंदी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.