10 दिवसात न्याय न मिळाल्यास आत्महत्या करणार - आठवीतल्या मुलीचं राष्ट्रपतींना पत्र
By admin | Published: February 17, 2016 02:08 PM2016-02-17T14:08:47+5:302016-02-17T14:08:47+5:30
मुख्याध्यापकाकडून माझी छळवणूक होत असून 10 दिवसात न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन असा इशारा देणारं पत्र, 13 वर्षांच्या मुलीनं राष्ट्रपतींना लिहिलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
आनंद (गुजरात), दि. 17 - मुख्याध्यापकाकडून माझी छळवणूक होत असून 10 दिवसात न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन असा इशारा देणारं पत्र, 13 वर्षांच्या मुलीनं राष्ट्रपतींना लिहिलं आहे. जवाहर नवोदय विद्यालयात शिकणा-या इशिका गुप्ता या आठवीतल्या मुलीनं शाळेचे मुख्याध्यापक किरण म्हस्के छळ करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, इशितानं असं म्हटलंय की, विकासनिधीच्या नावाखाली वर्गणी मागणा-या शाळेच्या मुख्याध्यापकांना तिच्या वडिलांनी राहूल गुप्तांनी या विषयी सखोल माहिती देण्याची मागणी केली. त्यामुळे इशिताला त्रास देण्यात येत असल्याचा तिचा दावा आहे.
विद्यार्थ्यांकडून विविध शुल्क घेण्यात आली, परंतु त्याच्या पावत्या देण्यात आल्या नसून या रकमेचं काय झालं असं विचारणारा माहिती अधिकाराचा अर्जही राहूल यांनी केला होता. डिसेंबरमध्ये आजारी असूनही इशिताला सुट्टी नाकारण्यात आली आणि नंतर तिला मुख्याध्यापकांनी मारहाण केली असाही आरोप तिने केला आहे.
यापूर्वीही इशितानं राष्ट्रपतींना पत्र लिहून मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. मात्र, आता लिहिलेल्या पत्रात जर 10 दिवसांत न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आनंदचे तहसीलदार धवल पटेल यांनी इशिताच्या तक्रारीत काही तथ्य नसल्याचा दावा केला आहे. ही फार जुनी गोष्ट आहे, आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु इशिताचे पालक आडमुठे असल्याचं पटेल यांचं म्हणणं आहे. शाळेच्या व्यवस्थापनानंही संप घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गुप्ता यांच्यावर नोंदवला आहे. गुप्ता कुटुंब दबावतंत्र अवलंबत असल्याचं पटेल यांचं म्हणणं आहे.