जूनपर्यंत १,५०० कोटी न भरल्यास पुन्हा तुरुंग, सुब्रतो रॉयना कोर्टाची तंबी
By admin | Published: April 28, 2017 01:52 AM2017-04-28T01:52:41+5:302017-04-28T01:52:41+5:30
सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या पॅरॉलची मुदत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १९ जूनपर्यंत वाढविली.
नवी दिल्ली : सहारा उद्योगसमुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या पॅरॉलची मुदत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १९ जूनपर्यंत वाढविली. मात्र त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी रॉय यांनी कबूल केल्याप्रमाणे १५ जूनपर्यंत १,५०० कोटी रुपये ‘सीबी’कडे जमा केले नाहीत तर त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी केली जाईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली.
आधी दिलेल्या अदेशानुसार सुब्रतो रॉय न्या. दीपक मिश्रा, न्या. रंजन गोगोई व न्या. ए.के. सिक्री यांच्या खंडपीठापुढे हजर राहिले. आपण १५ जूनपर्यंत १,५०० कोटी रुपये व त्यानंतर १५ जुलैपर्यंत आणखी ५५२.२२ कोटी रुपये ‘सेबी’कडे जमा करू, असे वचन देणारे प्रतिज्ञापत्रही त्यांनी सादर केले. सहारा ‘सेबी’कडे ‘आरटीजीएस’ने १५ जूनपर्यंत पैसे जमा करू शकेल, असे स्पष्ट करण्यात आले. जुलैमधील हप्त्याचा अग्रिम चेक रॉय यांनी सादर केला. हप्त्याने पैसे परत करण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी जे वेळापत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसार रॉय यांना प्रत्येक तारखेला पैसे द्यावे लागतील. अन्यथा पॅरोल रद्द करून पुन्हा तुरुंगात रवानगी केली जाईल, अशी खंडपीठाने त्यांना समज दिली.
१९ जूनलाही त्यांना जातीने हजर राहण्यास सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अॅम्बी व्हॅलीचा लिलाव
गुंतवणूकदारांचे पैसे चुकते करण्यासाठी सहारा समुहाच्या लोणावळ््याजवळील अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश याआधीच दिले गेले आहेत. हा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या आॅफिशियल लिक्विडेटरमार्फत केला जाणार आहे. त्यांनी या मालमत्तेचे मूल्यांकनही केले आहे. आता लिक्विडेटरने लिलावाच्या अटी व शर्तींचा मसुदा तयार करून तो मंजुरीसाठी १९ जूनपरर्यंत सादर करावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले.
वचन न पाळणाऱ्यास कैद-
दिलेले वचन न पाळून न्यायालयाचा अवमान (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) केल्याबद्दल चेन्नई येथील प्रकाश स्वामी या व्यक्तीस अटक करून त्यांची रवानगी एक महिन्याची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला. सहाराचे न्यूयॉर्क येथील एक पंचतारांकित हॉटेल खरेदी करण्यात स्वारस्य दाखवून या स्वामींनी एका विदेशी कुलमुखत्यार म्हणून एक प्रतिज्ञापत्र केले होते व त्यासाठी सुरुवातीची रक्कम म्हणून १०० कोटी रुपये जमा करण्याची तयारी दर्शविली होती. इरादा नेक आहे हे दाखविण्यासाठी स्वामी यांनी प्रथम १० कोटी रुपये जमाही केले. मात्र गेल्या तारखेला त्यांनी आता त्या कंपनीला खरेदीत स्वारस्य नाही, असे कळविले होते.