प्रवास करायचा नसेल, तर देऊन टाका रेल्वे तिकीट; हस्तांतरण कसे कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:01 PM2023-10-25T12:01:55+5:302023-10-25T12:03:30+5:30
आता प्रवासी आपले तिकीट हस्तांतरित करून पैसे वाचवू शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : रेल्वेचे तिकीट काढून ठेवले, तरी ऐनवेळच्या अडचणींमुळे अनेक जणांना प्रवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी तिकीट रद्द करून घ्यावे लागते अन्यथा पैसे बुडतात. तिकीट रद्द करायलाही शुल्क लागते. मात्र आता प्रवासी आपले तिकीट जवळच्या नात्यातील व्यक्तीस हस्तांतरित करून पैसे वाचवू शकतात.
कोणाला करता येणार?
आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांनाच तिकीट हस्तांतरित केले जाऊ शकते. इतर नात्यातील व्यक्तींना तिकीट हस्तांतरित केले जाऊ शकत नाही.
हस्तांतरण कसे कराल?
रेल्वेचे तिकीट हस्तांतरित करण्यासाठी रेल्वे प्रस्थापनाच्या २४ तास आधी आरक्षण काउंटवर प्रत्यक्ष जावे लागेल. तिकीट ऑनलाइन खरेदी केले असले तरी हस्तांतरण काउंटरवरूनच होते. ऑनलाइन हस्तांतरण होत नाही. तिकिटाची प्रिंटआउट आणि ज्याच्या नावे तिकीट करायचे आहे, त्याचे मूळ आयडी कार्ड तसेच एक झेरॉक्स घेऊन काउंटरवर जावे लागेल.
कोणते तिकीट होईल?
केवळ कन्फर्म रेल्वे तिकीटच हस्तांतरित होऊ शकते. प्रतीक्षा यादीतील अथवा आरएसी तिकीट हस्तांतरित होत नाही.