परवानगी दिलीत मग तुम्हीच दंड भरा, श्री श्री रवीशंकर यांचा अजब तर्क
By admin | Published: April 20, 2017 01:05 PM2017-04-20T13:05:27+5:302017-04-20T13:07:26+5:30
यमुना नदीच्या किना-यावर झालेल्या नुकसानासाठी परवानगी देणारं सरकार आणि न्यायालय जबाबदार असल्याचा अजब दावा श्री श्री रवीशंकर यांनी केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) न्यायालयाने श्री श्री रवीशंकर यांना खडे बोल सुनावत चांगलंच फटकारलं आहे. "तुम्हाला जबाबदारीची जराही जाणीव नाही. तुम्हाला काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे असं तुम्हाला वाटतं का ?", असा संतप्त सवाल न्यायालयाने विचारला. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किना-यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन होऊन झालेल्या नुकसानासाठी परवानगी देणारं सरकार आणि न्यायालय जबाबदार असल्याचा अजब दावा श्री श्री रवीशंकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुनच न्यायालयाने नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारलं.
"जर का दंड वसूल करायचाच असेल तर तो कार्यक्रमासाठी परवानगी देणा-या केंद्र, राज्य सरकार आणि राष्ट्रीय हरित लवादाकडून केला पाहिजे. जर का यमुना इतकीच नाजूक आणि शुद्ध आहे तर त्यांनी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाला परवानगीच द्यायला नको होती", अशी पोस्ट श्री श्री रवीशंकर यांनी फेसबूकवर केली होती.
‘प्रसंगी कारागृहात जाण्याची माझी तयारी राहील. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ठोठावलेला एक रुपयाचाही दंड देणार नाही,’ या शब्दांत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आव्हान दिले होते. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर महोत्सव आयोजित केल्यामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल लवादाने ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.