हिंमत असेल तर CAA बाबत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली सार्वमत घ्या, ममतांचे मोदींना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 07:27 PM2019-12-19T19:27:17+5:302019-12-19T19:29:04+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
कोलकाता - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मोदींवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षणाखाली सार्वमत घ्यावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.
गुरुवारी एका प्राचरसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यासारख्या कुठल्याही निष्पक्षपाती संघटनेच्या देखरेखीखाली सार्वमत घ्यावे आणि किती नागरिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने आहेत आणि किती नागरिक विरोधात आहेत हे विचारावे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७३ वर्षांनी आम्हाला अचानकपणे आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करावे लागणार आहे. तुम्ही तुमचा विरोध मवाळ करू नका कारण आपल्याला नागरिकत्वविरोधा कायदा रद्द करायचा आहे.''
#WATCH West Bengal Chief Minister Mamata Banerjee in Kolkata: Let there be an impartial organisation like United Nations or Human Rights Commission form a committee to see how many people are in favour or against #CitizenshipAmendmentAct. pic.twitter.com/qiqhKt3Cxu
— ANI (@ANI) December 19, 2019
कोलकातामधील धर्मतला येथे एका आंदोलनात सहभागी झालेल्या ममता बॅनर्जी यांनी मंचावर आंदोलकांसोबत आंदोलनात सहभागी होत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला विरोध केला. ''सध्या भाजपा खास प्रकारच्या टोप्या खरेदी करत आहे. या टोप्या परिधान करून ते हिंसाचार माजवण्यास सांगणार आहे जेणेकरून एक समुदाय बदनाम व्हावा हा त्यांचा हेतू आहे. त्यांना यशस्वी होऊ देऊ नका.''असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.