'करकरे असते तर यापूर्वीच दोषमुक्त झालो असतो'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 03:41 AM2019-04-22T03:41:07+5:302019-04-22T03:41:31+5:30
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीचा पुण्यातील पत्रकार परिषदेत दावा
पुणे : हुतात्मा हेमंत करकरे यांच्याविषयी मला आदर आहे़ ते असते तर यापूर्वीच मी या खटल्यातून दोषमुक्त झालो असतो. हुतात्म्याविषयी कोणी अनावधानानेही अवहेलना करु नये, असे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले़
बॉम्बस्फोटातील आरोपी राकेश धावडे, त्यांच्या वकील नीता धावडे आदी उपस्थित होते़ कुलकर्णी म्हणाले, साध्वींनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे़ आमचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंध नाही, हे करकरे यांना समजल्यानंतर आम्हाला मारहाण झाली नाही़ ते जिवंत असते तर त्यांनी दोषारोप दाखल करण्यापूर्वीच आम्हाला वगळले असते़ ते गेल्याने आमचे नुकसान झाले़ दहशतवाद विरोधी पथकातही काही चांगले अधिकारी आहेत, त्यांच्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत.
नऊ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर राकेश धावडे यांचे चार प्रकरणातील निर्दोषत्व सिद्ध झाले. मी वकील असूनही त्याला मदत करुन शकले नाही, सामान्य आरोपींची काय गत होत असेल, असा प्रश्न अॅड़ नीता धावडे यांनी केला़ राकेश धावडे यांनी सांगितले की, मी इतिहासाचा अभ्यासक आहे़ तेव्हाच्या राजकारणाचा आम्ही बळी आहोत़ मला ६२ दिवस अमानवीय मारहाण झाली़ आता खटल्यातून पूर्णत: काढून टाकले आहे़
प्रज्ञा सिंहांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत खटला चालू आहे. त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, अजित अभ्यंकर, सुभाष वारे, किरण मोघे, सुनीती सु. र., डॉ. वर्षा आल्हाट आदी सुमारे चाळीस विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीपत्रावर स्वाक्षरी केली आहे.