तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं आहेत?; मग लवकर म्हातारे व्हाल, संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 10:43 AM2022-06-02T10:43:52+5:302022-06-02T10:45:01+5:30

तुम्हाला जर दोनपेक्षा जास्त मुलं असतील, तर तुमचं आयुष्य आताच ६.२ वर्षांनी कमी झालं आहे. तुमची संपत्ती कमी झाली आहे.

If you have more than two children, your life expectancy is reduced by 6.2 years. | तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं आहेत?; मग लवकर म्हातारे व्हाल, संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं आहेत?; मग लवकर म्हातारे व्हाल, संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

Next

तुम्हाला किती मुलं आहेत? दोन? तीन? त्यापेक्षा जास्त?.. तुम्हाला जर दोन किंवा त्यापेक्षा कमी मुलं असतील तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. मात्र तीन किंवा त्यापेक्षा जास्त मुलांचे तुम्ही आई किंवा वडील असाल, तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. पूर्वीच्या काळी अनेक पालकांना दोनपेक्षा जास्तच मुलं असत. हळूहळू ती संख्या कमी होत आता दोन किंवा एकवर आली आहे. तरीही आजही अनेक पालक असे आहेत, ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत.

संशोधकांनी याबाबत धोक्याचा इशारा देताना सांगितलं आहे, तुम्हाला जर दोनपेक्षा जास्त मुलं असतील, तर तुमचं आयुष्य आताच ६.२ वर्षांनी कमी झालं आहे. तुमची संपत्ती कमी झाली आहे. यापुढेही होणार आहे. तुम्हाला आजारपणाला जास्त प्रमाणात सामाेरं जावं लागणार आहे.  अधिक वर्षे काम करीत राहावं लागणार आहे. तुमच्या डोक्याची चिंता आणि काळजी अधिक वाढणार आहे.. हे आणि असं बरंच काही..संशोधक सांगतात, आम्ही अतिशय काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं आमचं म्हणणं मांडतो आहोत. याला शास्त्रीय आधार तर आहेच, पण वस्तुस्थितीही तेच दाखवते. ज्यांना आधीच दोनपेक्षा जास्त मुलं आहेत, त्यांनी पुढे आणखी मुलं होऊ देऊ नयेत आणि नवविवाहितांनीही आपल्या कुटुंबाची संख्या मर्यादित राहील याची काळजी घ्यावी. 

यासंदर्भात युरोपातील ‘आरोग्य, वाढते वय आणि रिटायरमेंट सर्व्हे’च्या (SHARE) माहितीचे त्यांनी विश्लेषण केले. संशोधकांनी ज्या पालकांचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, तसेच ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्यं आहेत, अशा एक हजारपेक्षा जास्त माता आणि पिता पालकांचा अभ्यास केला. या अभ्यासात युरोप आणि इस्त्रायलमधील वेगवेगळ्या वीस अंतरराष्ट्रीय ठिकाणांतील माता-पिता पालकांचा समावेश होता. या अभ्यासात त्यांना आढळून आलं, ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत, त्यांच्यावर मानसिक ताण तर अधिक होताच. पण, आर्थिक ताणानंही त्यांना सतावलं होतं. त्यामुळे अनेक पालकांना तुलनेनं अधिक काळ, अधिक काम करावं लागत होतं. त्यांना जास्त ताणतणावांनाही सामोरं जावं लागलं होतं. त्याचा त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम झाला होता. आकलनाच्या पातळीवरही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. 

स्मरणशक्ती कमी होणं, लक्ष केंद्रित करायला अवघड होणं, बुद्धिमत्ता कमी होणं, योग्य निवड करण्यात अक्षम ठरणं किंवा त्यासाठी अधिक वेळ लागणं.. अशा एक ना अनेक समस्या अशा पालकांमध्ये निर्माण होतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे. अर्थातच त्यात माता किंवा पिता पालक कोणीही अपवाद नाही. दोघांनाही सारख्याच प्रकारच्या ताणांना सामोरं जावं लागतं. मुलांच्या भविष्याच्या काळजीमुळे पालकांच्या स्वत:च्याच भवितव्याबद्दल अनेक समस्या निर्माण होतात. बऱ्याच पालकांना हा ताण सहन होत नाही. अनेक वर्षे सातत्यानं या ताणाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं तारुण्य, प्रौढपण कोमेजतं आणि ते अकाली वृद्ध होतात. आपल्या वास्तविक वयापेक्षा ते अधिक म्हातारे तर दिसतातच, पण त्यांचं आयुष्यही किमान सहा ते सात वर्षांनी कमी होतं. 

सतत कामात व्यस्त राहावं लागत असल्यामुळे या पालकांना पुरेशी शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळत नाही. त्यांच्या डोक्यात कायम मुलांच्या भवितव्याचा आणि आपल्यावरच्या वाढत्या जबाबदाऱ्यांचाच विचार असतो. मानसिक स्वास्थ्य हरपल्यानं आणि त्याच्या तंदुरुस्तीसाठी पुरेसा वेळ आणि पैसा हातात नसल्यानं अशा पालकांची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. असे पालक वारंवार आजारी पडतात आणि या आजारपणामुळेही पैशांची त्यांची निकड वाढत जाते. एका विचित्र अशा दुष्टचक्रात ते अडकतात. वार्धक्यातही जबाबदाऱ्यांची रांग संपता संपत नसल्यानं इच्छा आणि क्षमता नसतानाही त्यांना काम करत राहावं लागतं. 

तुम्हाला एकच मूल असलं तर?..

संशोधक म्हणतात, तुम्हाला जर दोनपेक्षा जास्त मुलं असतील, तर तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची अधिक काळजी घ्यावी लागते. तरच तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. पण, संशोधक आता आणखीही काही गोष्टींचा अभ्यास करताहेत. समजा तुम्हाला एकच मूल असलं किंवा तुम्हाला एकही मूल नसलं तर त्याचा  त्या दाम्पत्यावर काय आणि कसा परिणाम होतो, याचा अभ्यास आता संशोधक करताहेत.

Web Title: If you have more than two children, your life expectancy is reduced by 6.2 years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य