Sanjay Raut: महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, संजय राऊतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:21 PM2022-11-24T12:21:08+5:302022-11-24T12:28:03+5:30
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत
नागपूर : महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी भाषिकांची गावे मिळविण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात लढा देईल, असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटक आणि जत वादावार केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आक्रमक झाले असून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा या वादावरुन निशाणा साधला.
महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. ह्या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही स्वाभिमानाने उभी आहे. मात्र, सरकार तंत्र मंत्रात अडकलं आहे, त्यामुळे परराज्यातून राज्यात संकट येतात. कर्नाटकने महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे, फक्त बोलून चालणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी कर्नाटक वादावर इशारा दिला. तसेच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सीमा भागाचा भार होता ते अजूनपर्यंत दहा वर्षात का गेले नाहीत, किती मंत्री सीमाभागात जावून आले आहेत?, असा सवालही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
उद्या महाराष्ट्र मागतील
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात मत व्यक्त केलं. ''जत हे त्यांचं नाही, मुंबई स्वतंत्र झाली तेव्हा सर्वच महाराष्ट्र हा आपल्याला मिळाला नव्हता. महाराष्ट्र सीमेवरील काही भाग हे महाराष्ट्राला मिळाले नाहीत. आज ते जत मागत आहेत, उद्या मुंबई मागायला देखील कमी करणार नाहीत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या सरकारने उत्तर द्यायला हवे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री शिंदे यांनी सीमाप्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतल्यानंतर आणि त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये केली असतील. आपण एकाच देशात राहतो. त्यामुळे शत्रुत्व नसले तरी कायदेशीर लढा मात्र आहेच. एकत्रित बैठका घेऊन प्रश्न सुटणार असतील, सिंचनाचे विषय मार्गी लागणार असतील, तर बैठका व्हायलाच हव्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.