‘‘आपण बिहार-बंगालवर कब्जा कराल तर आम्ही काय लॉलीपॉप खाणार का"? ममतांनी बांगलादेशला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:52 IST2024-12-09T18:51:47+5:302024-12-09T18:52:29+5:30
“जेव्हा बाह्य शक्ती भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आम्ही बसून काय लॉलीपॉप खाणार का?"

‘‘आपण बिहार-बंगालवर कब्जा कराल तर आम्ही काय लॉलीपॉप खाणार का"? ममतांनी बांगलादेशला फटकारलं
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, बंगाल, बिहार आणि ओडिशावर आपला वैध दावा असल्याच्या बांगलादेशी नेत्यांच्या विधानावर सोमवारी आश्चर्य व्यक्त करत निशाणा साधला आहे. “जेव्हा बाह्य शक्ती भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा आम्ही बसून काय लॉलीपॉप खाणार का?" असा प्रश्न त्यांनी केला आहे.
ममता यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभेत लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले, तसेच बांगलादेशात केल्या जाणाऱ्या विधानांवर आक्रोशित न होण्याचे आवाहन करत, पश्चिम बंगाल नेहमीच केंद्राकडून घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही निर्णयासोबत उभा राहील, असे म्हटले आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच बांगलादेशातील काही नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानांची खिल्ली उडवत, "शांत राहा, निरोगी राहा आणि मानसिक शांतता राखा," असे म्हटले आहे.
प्रक्षोभक विधानांकडे दुर्लक्ष करा -
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) नुकतेच ढाका येथील एका जाहीर सभेत, बंगाल, बिहार आणि ओडिशावर देशाचा वैध दावा असल्याचे म्हटले होते. यानंतर, पश्चिम बंगालच्या जनतेने शांत राहावे आणि बांगलादेशात काही लोकांकडून होणाऱ्या प्रक्षोभक विधानांमुळे प्रभावित होऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. याशिवाय, आपल्या राज्यात, इमामांनीदेखील बांगलादेशातील अल्पसंख्यकांविरोधात होणाऱ्या विधानांचा आणि हल्ल्यांचा निषेध केला असल्याचेही त्या म्हणाल्या.
ममता सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल -
मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, "आपले सरकार आणि तृणमूल काँग्रेस पक्ष परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल आणि पूर्वसूचनेशिवाय कुठलेही भाष्य करणार नाही. आपले परराष्ट्र सचिव चर्चेसाठी बांगलादेशात आहेत. आपण आवश्यकतेशिवाय अधिक बोलणे योग्य नाही. आपण निकालाची वाट बघायला हवी. आपण जबाबदार नागरिक आहोत. आपला देश एकसंध आहे."