राम मंदिराचा विरोध केला तर शिरच्छेद करू: भाजपा आमदार
By admin | Published: April 9, 2017 05:19 PM2017-04-09T17:19:56+5:302017-04-09T18:10:58+5:30
अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून भाजपाचे आमदार राजा सिंग यांनी वादग्रस्त विधान केलं
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 9 - अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून भाजपाचे आमदार राजा सिंग यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला तर त्याचा शिरच्छेद करू असं ते म्हणाले आहेत. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.
"राम मंदिर बांधल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल असं म्हणणा-यांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या अशाच विधानाची वाट पाहत होतो, जेणेकरून आम्ही तुमचा शिरच्छेद करू शकतो" असं ते म्हणाले. यापुर्वीही राजा सिंग यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. राजा यांनी मध्यंतरी फेसबुकवर व्हिडीओ टाकून दलितांना मारहाण करण्याचं समर्थन केलं होतं. जे दलित गोमांस खातात आणि गायींची हत्या करताता त्यांना अशाच प्रकारे मारहाण केली जावी असं ते म्हणाले होते.
6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. अजून या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिलेला नाही. याप्रकरणी न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता तसेच याप्रकरणी मध्यस्ती करण्याची तयारीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दाखवली. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 14 जणांवर खटला सुरु आहे. राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.