पाकने दु:साहस केल्यास कठोर प्रत्युत्तर
By admin | Published: October 11, 2014 12:44 AM2014-10-11T00:44:47+5:302014-10-11T00:44:47+5:30
: पाकिस्तानने शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्याचे दु:साहस न टाळल्यास रोखठोक प्रत्युतर दिले जाईल, असा कठोर इशारा भारताने शुक्रवारी पुन्हा दिला.
नवी दिल्ली : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करण्याचे दु:साहस न टाळल्यास रोखठोक प्रत्युतर दिले जाईल, असा कठोर इशारा भारताने शुक्रवारी पुन्हा दिला.
भारताने शांततापूर्ण वातावरणात द्विपक्षीय चर्चेबद्दल गंभीर असल्याचे दाखवले असताना पाकिस्तानने त्याबदल्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबद्दल द्वेषपूर्ण अपप्रचार चालविला आहे. पाकचा आंतरराष्ट्रीय सीमेवरील नागरिकांविरुद्ध हिंसाचार आणि दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे आम्ही योग्य प्रतिक्रिया देण्याच्या मन:स्थितीत आहोत. तणाव वाढवायचा की निवळायचा हे त्या देशावर अवलंबून असेल. पाकिस्तान आणि त्या देशाच्या सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमा आणि जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील दु:साहस टाळण्याची गरज आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केले.
सीमेवर शांतता आणि सलोखा राखण्यासाठी शस्त्रसंधीचे पालन केले जावे. तेथे शांतता प्रस्थापित झाली तरच नागरिकांना घरी परतणे शक्य होईल. भारत कसे प्रत्युत्तर देणार या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही प्रत्युत्तर दिले आहे. आपण भीती न ठेवता चर्चा करू तेव्हा चर्चेची भीती उरणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)