बलात्काराची तक्रार नोंदवली तर लोकांना तोंड कसं दाखवशील? आझम खान
By Admin | Published: November 20, 2015 01:28 PM2015-11-20T13:28:48+5:302015-11-20T13:31:51+5:30
बलात्काराची तक्रार केल्यास प्रसिद्धी मिळेल आणि त्यामुळे बदनामी झाल्यास समाजाला तोंड कसं दाखवशील?' असा असंवेदनशील सवाल खान यांनी बलात्काराची तक्रार घेऊन आलेल्या महिलेला विचारला
>ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २० - अनेक वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असलेले उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा मुक्ताफळे उधळली आहेत. 'बलात्काराची तक्रार केल्यास प्रसिद्धी मिळेल आणि त्यामुळे बदनामी झाल्यास समाजाला तोंड कसं दाखवशील?' असा असंवेदनशील सवाल खान यांनी कानपूरमधील बलात्काराची तक्रार घेऊन आलेल्या महिलेला विचारला.
पीडित महिला तिच्या वकिलांसह गुरूवारी कानपूरमधील खान यांच्या कार्यक्रमास उपस्थित होते. खान यांना भेटण्यासाठी त्या महिलेने व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. 'आत्ता व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करणा-या भगिनीने गोंधळ का घातला, हे समजू शकलं नसलं तरी प्रकरण नक्कीच गंभीर असल्याचे दिसत आहे', असं खान म्हणाले. मात्र ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर बलात्काराची तक्रार नोंदवल्यास प्रसिद्धी मिळते, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. ' या भगिनीची तक्रार बदनामीकारक आहे, आणि जर त्याला प्रसिद्धी मिळाली तर ती जगाला तोंड कसं दाखवू शकेल? असही खान म्हणाले.
खान यांच्या या विधानामुळे पीडित महिला अतिशय नाराज झाली आहे. ' यापुढे खान यांच्याकडे कधीच तक्रार घेऊन जाणार नाही. त्यांचे वक्तव्य, भाषा खूप निराश करणारे आहे, त्यांनी मला मदत करायला हवी होती' असे तिने म्हटले.
दरम्यान खान यांच्या या विधानांनंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. उत्तर प्रदेशचे भाजपाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनीही आझम खान यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जर एखादी महिला खान यांच्याकडे तक्रार घेऊन येत असेल तर त्यांनी त्यावर अशी सार्वजनिकरित्या टिपण्णी करण्याऐवजी त्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यायला हवी होती, ' अशी टीका वाजपेयी यांनी केली.