गाईंची तस्करी कराल तर जमावाच्या मारहाणीत मराल, भाजपा आमदाराची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 09:19 AM2017-12-25T09:19:33+5:302017-12-25T11:56:00+5:30
वादग्रस्त विधानांमुळे नेहमची चर्चेत असणारे भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत
जयपूर- वादग्रस्त विधानांमुळे नेहमची चर्चेत असणारे राजस्थानमधील भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या आणखी एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ज्ञानदेव अहुजा यांनी एक वादग्रस्त विधान करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गायींची तस्करी आणि हत्या करणाऱ्यांना लोकांचा मार खाऊन जीव गमवावा लागेल, असं ज्ञानदेव अहुजा यांनी म्हटलं आहे. अलवार जिल्ह्यात गायींची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. झाकीर नावाचा एक व्यक्ती ट्रकमधून अवैधपणे गायींना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप आहे. अलवरच्या खिलोरा गावाजवळ स्थानिकांनी झाकीरचा ट्रक पकडला. त्यामध्ये आठ गुरं होती. झाकीर गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला बेदम मारहाणही केली. पण, पोलिसांनी वेळीच त्याला स्थानिकांच्या तावडीतून सोडवून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या घटनेला उद्देशून ज्ञानदेव अहुजा यांनी हे वादग्रस्त विधान केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गायींची तस्करी आणि हत्या करणाऱ्यांना अशाचप्रकारे जमावाचा मार खाऊन मरावं लागेल, हे माझं स्पष्ट मत आहे. पण, त्यानंतर अहुजा यांनी सारवासारव करताना झाकीरला स्थानिकांकडून मारहाण झाल्याचं नाकारलं. स्थानिक लोक झाकीरचा ट्रक अडवण्याचा प्रयत्न करत होते. पण, पळून जाण्याच्या नादात त्याचा ट्रक उलटला. यावेळीच त्याला दुखापत झाली. पण, आता तो लोकांना आपल्याला मारल्याचा खोटा दावा करत आहे. मी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानुसार लोकांनी झाकीरला मारलंच नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे, असा दावा ज्ञानदेव अहुजा यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या लोकांवर गुन्हे दाखल केले असून चौकशी सुरू आहे.