या बेटावर जाण्याचा प्रयत्न कराल तर...जीव गमावून बसाल!
By admin | Published: April 24, 2016 02:47 AM2016-04-24T02:47:31+5:302016-04-24T02:47:31+5:30
अंदमान-निकोबारच्या कुशीतलं एक बेट... जिथं हजारो वर्षांपासून कोणतीच बाहेरची व्यक्ती जाऊ शकली नाही... प्रयत्न करणाऱ्यांवर झाला बाणांचा वर्षाव... त्या... ‘नॉर्थ सेंटिनल आयलंड’विषयी...
अंदमान-निकोबारच्या कुशीतलं एक बेट... जिथं हजारो वर्षांपासून कोणतीच बाहेरची व्यक्ती जाऊ शकली नाही... प्रयत्न करणाऱ्यांवर झाला बाणांचा वर्षाव... त्या... ‘नॉर्थ सेंटिनल आयलंड’विषयी...
एक असं बेट जिथलं निसर्गसौंदर्य अजूनही आधुनिक जगाच्या प्रदूषणापासून वाचलेलं आहे... जिथला समुद्रकिनारा सगळ्या प्रदूषणापासून दूर आहे आणि जिथलं अलौकिक सौंदर्य पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल... पण तिथं जाण्याचा तुम्ही प्रयत्न जरी केला तरी जीव गमावून बसाल...
हजारो वर्षांपासून बाहेरची कोणतीच व्यक्ती या बेटावर जाऊ शकलेली नाही. ज्यांनी ज्यांनी इथं जाण्याचा प्रयत्न केला त्यांचा एकतर मृत्यू झाला किंवा त्यांच्यावर धनुष्यबाणांचा वर्षाव करून त्यांना हाकलण्यात आलं. जणू ही भूमी फक्त आणि फक्त आमची आहे आणि भूमीवर कोणतीही बाहेरील व्यक्ती आलेली आम्हाला आवडणार नाही, अशी इथल्या आदिवासींची इच्छा एकूणच त्यांच्या वर्तनातून दिसून आलेली आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या पश्चिमेला असलेल्या या ‘नॉर्थ सेंटिनल आयलंड’वर जवळपास ४०० आदिवासी असतील, अशी शक्यता आहे. क्षेत्रफळ ७० चौरस किलोमीटर. सर्वच बाजूंनी निळ्याशार लाटांचा समुद्रकिनारा. पण या चारशे शूरांनी आतापर्यंत एकाही बाहेरच्या व्यक्तीला बेटावर प्रवेश करू दिलेला नाही. एकोणिसाव्या शतकात अनेक बोटी या बेटावरच्या खडकांना आदळल्या; पण कोणीच या बेटावर शिरू शकलं नाही. अनेक खलाशांनी या बेटाच्या किनाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आदिवासींनी केलेल्या बाणांच्या माऱ्याचाच सामना करावा लागला. एकदा १८९७मध्ये काही पोलीस गुन्हेगाराला शोधायला म्हणून या बेटावर गेले. त्यांनी कसाबसा बेटावर प्रवेशही मिळवला; पण त्या गुन्हेगाराचा मृतदेह त्यांना बाणांनी छिन्नविछिन्न झालेला आणि गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. गुन्हेगाराची ही अवस्था पाहून पोलिसांनीच तिथून पळ काढला.
आॅगस्ट १९८१मध्ये ‘द प्रिमरोज’ नावाची एक बोट या बेटाच्या किनाऱ्याला लागली. आदिवासींनी भाले बाणांचा वर्षाव केला. सुदैवानं कोणालाही गंभीर इजा झाली नाही आणि त्या साऱ्यांची हेलिकॉप्टरद्वारे सुखरूप सुटका करण्यात आली.
शास्त्रज्ञांनी अनेक वेळा या बेटावरील आदिवासींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेक भेटवस्तू त्यांच्यासाठी पाठवल्या. पण फरक पडला नाही. आदिवासी अशा कोणत्याच आमिषाला भूलले नाहीत आणि त्यांनी पुन्हा आपले भाले उगारले.
एका भारतीय शास्त्रज्ञाने १९९१ साली या आदिवाशींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी त्याला संवाद साधायचा होता. त्यानं शक्कल लढवली. त्यानं लाल रंगाच्या काही प्लॅस्टिक बकेट बेटाच्या किनाऱ्यावर सोडल्या. आदिवासींनी त्या जमाही केल्या; पण संवाद साधण्यासाठी ते पुढे आले नाहीत. असं म्हणतात की, या आदिवाशींच्या रडण्याचा आवाज आणि बोलण्याची पद्धत काहींनी ऐकली आहे. पण ती भाषा आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहावरील इतर आदिवाशींची भाषा यात कोणतेही साम्य नव्हते. त्यावरून असा निष्कर्षही काढण्यात आला की, या आदिवासींनी त्यांच्या बेटाजवळ असलेल्या द्वीपसमूहाशीही हजारो वर्षांपासून संबंध ठेवला नसेल.
हे बेट अधिकृतरीत्या भारताचा भाग आहे. पण या बेटावरील आदिवासींच्या आयुष्यात फेरफार न करण्याची भारत सरकारची इच्छा आहे. ते जसे आहेत, तसेच त्यांनी जगावे... अशी भारताची भूमिका आहे. आता तर भारत सरकारही तेथे कोणता पर्यटक जाणार नाही, याची काळजी घेत असते. कारण हेच... तिथं जाणं एकतर पर्यटकासाठी धोक्याचं आहे; आणि बाहेरून जाणाऱ्यांची तेथील आदिवासींना बाधाही होऊ नये.
जग कितीही आधुनिक झालं असेल किंवा पुढारलं असेल तरी इथं अजूनही अश्मयुग आहे. इथल्या आदिवासींनी त्यांची संस्कृती गेल्या अनेक युगांपासून जपली आहे. पण... जगाच्या वेगवान विकासापासून दूर राहून या बेटावरील आदिवासींनी तग धरला तरीही अजून किती काळ?
हा प्रश्न आहेच....
(संकलन : प्रतिनिधी)