काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे तर ४ डिसेंबरपर्यंत अर्ज भरा - सुशीलकुमार शिंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:10 AM2017-12-01T06:10:54+5:302017-12-01T06:10:59+5:30
काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी...
मुंबई : काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शहजाद पुनावाला यांना प्रत्युत्तर दिले. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुनावाला यांच्यावर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस कार्यकर्ता शहजाद पुनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राहुल गांधींची अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. मात्र, ही इलेक्शन नाही तर केवळ सिलेक्शनची प्रक्रिया आहे, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.
पुनावाला यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. शिंदे म्हणाले, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोण काय म्हणाले हे महत्त्वाचे नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही प्रक्रि या पार पडत आहे. ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ज्यांना ही निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्यांनी अर्ज दाखल करावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
कारवाई करणार - अशोक चव्हाण
पुनावाला यांनी पक्षाच्या विरोधात भाष्य केल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी म्हटले आहे. पुनावाला यांनी बूथ, जिल्हा, प्रदेश पातळीवर कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतला नाही.
निवडणुकीसाठी डेलीगेट व्हावे लागते. त्यांचे नाव कोठेही नाही, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हे केले आहे. दुसरीकडे एखादे पद मिळावे म्हणून ते हे उद्योग करत असतील, अशी शंकाही चव्हाण यांनी व्यक्त केली.