परीक्षेत चांगले गुण हवे असल्यास शिवलिंग बनवा, मुस्लिम विद्यार्थिनींचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 01:35 PM2017-08-02T13:35:21+5:302017-08-02T13:59:29+5:30
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सरकारी शाळेत एका वर्कशॉपमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थिनींना मातीचे शिवलिंग तयार करण्यास सांगितले गेले. मात्र, यास मुस्लिम विद्यार्थिनींनी विरोध दर्शवला.
भोपाळ, दि. 2 - मध्य प्रदेशातील भोपाळ येथील सरकारी शाळेत एका वर्कशॉपचं आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थिनींना मातीचे शिवलिंग तयार करण्यास सांगितले गेले. चिंतेची बाब म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींना सांगितले की, जर तुम्हाला परीक्षेत चांगले गुण हवे असतील तर या वर्कशॉपमध्ये तुम्हाला सहभाग नोंदवावा लागेल.
यावेळी जवळपास 100 मुस्लिम विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकांचे म्हणणे फेटाळून लावत वर्कशॉपमध्ये सहभाग घेण्यास विरोध दर्शवला. ''द क्विंट''नं दिलेल्या बातमीनुसार, शिवलिंग बनवण्यास नकार दिल्यानंतर एका वर्गात बंद करण्यात आल्याचा आरोप या मुस्लिम विद्यार्थिनींनी केला आहे. काही वेळानंतर मुलींना घरी जाण्यास सांगण्यात आले. भोपाळमधील कमला नेहरू गर्ल्स हायर सेकंडरी स्कूलमधील ही घटना आहे. ही शाळा भोपाळमधील टी.टी. नगर परिसरात आहे. दरम्यान, हे वर्कशॉप शाळेतील काही अधिका-यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे शाळेच्या परिसरात अशा प्रकारे सुरू असलेला धार्मिक कार्यक्रम रोखण्याचाही प्रयत्न करण्यात आला नाही.
या शाळेमध्ये वेगवेगळ्या धर्मांमधील मुली शिकण्यासाठी येतात. शाळेच्या मुख्याध्यापिका निशा कामरानी यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, जर आपल्याला आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा आहे तर पूर्ण एकाग्रतेने शिवलिंग बनवा. या दरम्यान, शाळेत एक पुजारीदेखील हजर होते. त्यांनी माइकवरुन संस्कृत भाषेतील मंत्र सांगत यज्ञ केले.
जेव्हा मुस्लिम विद्यार्थिनींनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला त्यावेळी त्यांना एक वर्गात बसण्यास सांगितले गेले व कथित स्वरुपात शाळेतील अधिका-यांना त्यांना बंद केले. मुलींना या कार्यक्रमास विरोध केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले, अशीही माहिती समोर आली आहे.