दार्जिलिंगमध्ये राहायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर राहा
By admin | Published: June 13, 2017 04:37 PM2017-06-13T16:37:35+5:302017-06-13T16:37:35+5:30
दार्जिलिंगमध्ये राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
दार्जिलिंग, दि.13- दार्जिलिंगमध्ये राहायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर राहा असा इशारा गोरखा जनमुक्ती मोर्चाने पर्यटकांना दिला आहे. गोरखा जनमुक्तीचे अध्यक्ष बिमल गुरुंग यांनी याबाबत बोलताना सांगितले, "इथली स्थिती अधिकाधिक वाईट होत चालली आहे, येथे काहीही घडू शकते. त्यामुळे पर्यटकांनी दार्जिलिंग सोडावे असे माझे सांगणे आहे, तरिही ते येथे राहणार असतील त्यांनी स्वतःच्याच जबाबदारीवर राहावे."
दुसऱ्या दिवशीही गोरखा जनमुक्तीच्या सदस्यांनी सरकारी कार्यालये व इतर आस्थापने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला. गेले दोन दिवस या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यालये बंद करायला लावणाऱ्या गोरखा जनमुक्तीच्या सदस्यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोरखा जनमुक्तीच्या सदस्यांनी चौकबाझार परिसरात एकत्र येऊन स्वतंत्र गोरखा राज्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत लोकांना काम करण्यापासून रोखले. या सदस्यांना अटकाव करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही त्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत गर्दीला हटवले. गोरखा जनमुक्तीच्या या आंदोलनामुळे संपुर्ण परिसराची वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. गोरखा जनमुक्तीच्या आंदोलकाबरोबर चहाच्या मळ्यातील मजूरांनीही आंदोलनात सहभाग घेतलेला आहे.
दार्जिलिंगमधील स्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे येथील दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्याइतकी सामान्य परिस्थिती येण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. मात्र अजूनही पश्चिम बंगाल सरकारडून दार्जिलिंगच्या परिस्थितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.