देशात राहायचे असल्यास गोमांस खाणे सोडावे
By admin | Published: October 16, 2015 11:43 PM2015-10-16T23:43:11+5:302015-10-16T23:43:11+5:30
मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण यासाठी त्यांनी गोमांस खाणे सोडावे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपशासित हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.
चंदीगड : मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण यासाठी त्यांनी गोमांस खाणे सोडावे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपशासित हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. अर्थात हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून माफी मागण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
हरियाणातील खट्टर सरकारला महिनाअखेर एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत खट्टर यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. भारतात गाय ही पूज्य आहे. गायीला देशातील एक मोठा समाज पवित्र मानतो. याचाच विचार करून मुस्लिमांनी गोमांस खाणे सोडले पाहिजे. मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण त्यांनी गोमांस सोडावे, असे खट्टर या मुलाखतीत म्हणाले. उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाचा उल्लेख करून, दादरीत जे काही घडले ते चुकीचे होते. केवळ गैरसमजातून ही घटना घडली, असेही खट्टर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर खट्टर सावरासावर करताना दिसले. शुक्रवारी याबाबत बोलताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मी असे बोललोच नाही. मात्र याउपरही माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे, असे खट्टर म्हणाले.
>>हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले असतानाच भाजपने मात्र यापासून स्वत:ला नामानिराळे केले. खट्टर जे काही बोलले, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. भाजपची ही भूमिका नाही. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलेन. आपल्या वक्तव्याने दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचे प्रत्येकाने भान राखायला हवे.
>>>>>विरोधकांकडून तीव्र शब्दांत सरकारची निंदा
नवी दिल्ली/ श्रीनगर : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याचे शुक्रवारी देशभर तीव्र पडसाद उमटले. हा देशाच्या लोकशाहीतील सर्वात दु:खद दिवस आहे. आता हरियाणाचे मुख्यमंत्री भारतीय नागरिकत्वासाठीची पात्रता ठरवणार का? हे मोदी शासनाचे नवे मॉडेल आहे का? असा खरपूस सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.
काँग्रेसचे अन्य एक नेते राशीद अल्वी यांनीही खट्टर यांचे विधान घटनाबाह्य असल्याचे सांगत त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. (वृत्तसंस्था)