कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड शिकावंच लागेल - मुख्यमंत्री सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 11:33 AM2017-11-01T11:33:40+5:302017-11-01T11:38:17+5:30
'राज्यातील सर्व शाळांनी कन्नड भाषा शिकवली पाहिजे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती कन्नड आहे. त्यांना इथली भाषा शिकलीच पाहिजे, आणि आपल्या मुलांनाही शिकवली पाहिजे', असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलले आहेत
बंगळुरु - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व शाळांनी कन्नडा शिकवलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. बंगळुरुमधील कांतीरवा स्टेडिअममध्ये आयोजित 62 व्या कर्नाटका राज्योत्सव कार्यक्रमात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटकात राहणा-या प्रत्येकाने कन्नड भाषा शिकलीच पाहिजे, आणि आपल्या मुलांनाही शिकवलं पाहिजे असा आग्रह केला आहे.
Everyone who lives here is a Kannadiga. Whoever lives in Karnataka should learn Kannada and make their children learn it too: Karnataka CM pic.twitter.com/UU0w2Lah6a
— ANI (@ANI) November 1, 2017
'राज्यातील सर्व शाळांनी कन्नड भाषा शिकवली पाहिजे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती कन्नड आहे. त्यांना इथली भाषा शिकलीच पाहिजे, आणि आपल्या मुलांनाही शिकवली पाहिजे', असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आपण कोणत्याही भाषेविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. 'पण जर तुम्ही कन्नड शिकण्यासाठी नकार देत असाल, तर याचा अर्थ तुम्ही त्या भाषेचा अनादर करत आहात', असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं.
I am not against learning any language. But if you don't learn Kannada, it means you're showing disrespect to the language: Karnataka CM pic.twitter.com/i7GUwzclIl
— ANI (@ANI) November 1, 2017
कर्नाटकात याआधी अनेक ठिकाणी मेट्रो स्थानकांवर लावण्यात आलेल्या हिंदी भाषेतील बोर्डला विरोध करत आंदोलन करण्यात आलं आहे. सिद्धरामय्या यांनी शहरी विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र लिहून नम्मा मेट्रोमधील हिंदी संकेत बदलण्याची मागणी केली होती.
‘नम्मा मेट्रो बंगळुरु’मधील हिंदी भाषेच्या वापरावरुन कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं. मेट्रोच्या प्रत्येक स्टेशनला कन्नड आणि इंग्रजीसोबत हिंदी भाषेतही नावं दिली गेली. स्टेशनवर कन्नड, इंग्रजीप्रमाणे हिंदीत अनाऊंसमेंट केली जात होती. याविरोधात कन्नड रक्षण वेदिके ही संघटना रस्त्यावर उतरली होती. या आंदोलनात सर्वच स्तरातून लोकांनी मोठा सहभाग घेतला होता. स्थानिक काँग्रेस सरकारने दबावापुढे नमतं घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या अहवालातील माहितीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बंगळुरू मेट्रोत हिंदी भाषेचा वापर नको, अशा मागणीचं पत्र लिहिलं होतं.