पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जी यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 04:15 PM2019-06-14T16:15:43+5:302019-06-14T16:33:32+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे.
कोलकाता : डॉक्टरांच्या संपामुळे घेरल्या गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांवर हल्ला चढविताना बंगाली कार्ड उघडले आहे. बाहेरच्या लोकांवरून भाजपवर नेम दरत त्यांनी जर बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असेही ममता म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून कोलकातामध्ये डॉक्टरांचा संप सुरु आहे. डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यावरून ममता बॅनर्जी लक्ष्य झाल्या आहेत. यामुळे ममता यांनी भाषिक मुद्दा उपस्थित करत बंगालला गुजरात बनू देणार नसल्याचे सांगितले.
उत्तर परगना जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करताना ममता यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आपल्याला बंगाली भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार, उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना राज्यात थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर इकडे तिकडे फिरतात, असे ममता म्हणाला.
डॉक्टरांना भाजपा आणि सीपीएम भडकवत असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे काम करत आहे, असा आरोप ममता यांनी केला.
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी यावर प्रतिक्रिया देताना ममता या आरोग्य मंत्री आहेत. त्यांच्या अहंकारमुळे गेल्या चार दिवसांत किती जणांनी मृत्यूच्या दारात जाण्याचा अनुभव घेतला असेल, काही तरी लाज बाळगा, असे ट्विट केले आहे.