केरळमध्ये मंदिरात इफ्तार पार्टी
By admin | Published: June 3, 2017 01:16 AM2017-06-03T01:16:25+5:302017-06-03T01:16:25+5:30
केरळच्या मलप्पुरम येथे बंधुभावाचे आदर्श उदाहरण पाहावयास मिळाले. श्री नरसिंहमूर्ती मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात इफ्तारचे
कोच्ची : केरळच्या मलप्पुरम येथे बंधुभावाचे आदर्श उदाहरण पाहावयास मिळाले. श्री नरसिंहमूर्ती मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात इफ्तारचे आयोजन केले. मंदिराशी संबंधित हिंदूंनी रोजेदारांसाठी विविध पदार्थ बनवून मोठ्या प्रेमाने मुस्लिमबांधवांना खाऊ घातले. मात्र, या इफ्तार पार्टीमागे आणखी एक कथा आहे.
मलप्पुरमचे श्री नरसिंहमूर्ती मंदिर जीर्ण झाले होते. त्याच्या जीर्णोद्धाराची गरज होती. मुस्लिम धर्मीयांनीच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे सुचवून त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी वर्गणी गोळा करून मंदिराला २० लाख रुपये दिले. त्यानंतर शेकडो वर्षे जुन्या या मंदिराचा जीर्णोद्धार होऊ शकला. मंदिराच्या दुरुस्तीसाठी मुस्लिम युवकांनी श्रमदान केले.
अनेक तरुणांनी वर्गणी गोळा करण्यासह पडेल ती कामे केली. मंदिर व्यवस्थापन आधी मुस्लिम युवकांसाठी भव्य मेजवानीचे आयोजन करणार होते. मात्र, नंतर रोजेदारांसाठी इफ्तारचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)
या भागातील हिंदू समाजाचे लोकही रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिमांना मदत करतात. रमजान हा केवळ मुस्लिमांचा नाहीतर संपूर्ण गावाचा उत्सव आहे, असे स्थानिक शिक्षक टी. असईनार यांनी सांगितले.
हे गाव हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे आदर्श उदाहरण आहे. जे लोक देशात, हिंदू-मुस्लिमांत धर्माच्या नावाखाली फूट पाडू इच्छितात त्यांनी या गावापासून धडा घ्यायला हवा, असे मंदिर समितीचे सचिव मोहनन यांनी म्हटले.