जीएसटी कपातीवेळी सूचनांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:39 PM2018-07-22T22:39:29+5:302018-07-22T22:39:49+5:30
महसुलावर विपरीत परिणामांची शक्यता; पीयूष गोयल यांनी परस्पर घेतला निर्णय
नवी दिल्ली : जीएसटीच्या दरात कपातीचा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे सपशेल दूर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. गोयल यांनी परस्पर निर्णय घेतल्याने या कर कपातीचा देशाच्या तिजोरीवर परिणाम होणार आहे.
राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने शनिवारी बैठकीत अनेक वस्तुंवरील जीएसटीच्या दरांत कपात केली.
काही राज्यांच्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका जवळ आल्याने गोयल यांनी हा निर्णय घेतला, हे उघड आहे. मात्र महसुलाला वार्षिक किमान ८ ते १० हजार कोटींचा फटका बसेल,असे अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांना वाटत आहे.
अर्थ मंत्रालयातील अधिकाºयांनी सांगितले की, याआधीच्या पद्धतीनुसार दर कपातीआधी मंत्रालयातील ‘फिटमेंट समिती’ त्याचा अभ्यास करीत असे. समितीने हिरवा कंदील दिला तरच करामध्ये कपातकरणण्याचा निर्णय घेण्यात येत असे. पण अलिकडच्या काळात अनेक वेळा अर्थमंत्र्यांनी परिषद बैठकीमध्ये अजेंड्यावर नसलेले कर कपातीचे निर्णय अचानक घेण्यात आले आहेत. शनिवारच्या बैठकीतही असेच निर्णय घेण्यात आले. ‘फिटमेंट समिती’ने ५०० रुपयापर्यंतच्या पादत्राणांवरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणण्याला नकार दिला. पण काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या आग्रहाखातर गोयल यांनी ५०० रुपयांची मर्यादा अचानक १००० रुपयांवर नेली. त्यामुळे आपोआपच कर कपात झाली आहे. त्यातून महसुलाचे नुकसान होईल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
> हवाई इंधनावरील अधिभार फेटाळला
जवळपास १०० वस्तूंवर कर कपात करताना महसूल भरुन काढण्यासाठी हवाई इंधनावर अधिभार लावण्याचे जीएसटी परिषदेने निश्चित केले होते. यामुळे विमानाची तिकीटे महाग होण्याची भीती असल्याने उद्योजकांच्या दबावात हा विषय बैठकीच्या अजेंड्यावर असतानाही ऐनवेळी टाळण्यात आला.
> आता २८ टक्क्यांत फक्त ३५ वस्तू
जीएसटी परिषदेने अनेक वस्तुंवरील कर कमी केल्यानंतर आता २८ टक्के श्रेणीत ३५ वस्तू शिल्लक आहेत. आतापर्यंत १९१ वस्तूंवरील कर कमी केला आहे. सुरुवातीला त्यात २२६ वस्तू होत्या. पण विविध दबावामुळे २८ टक्क्यांच्या श्रेणीत असलेल्या वस्तूंवरील कर कमी करण्याची वेळ जीएसटी परिषदेवर आली. काही वस्तू २८ टक्क्यांच्या श्रेणीतून १८ टक्क्यांवर आणल्या. यामुळे त्या श्रेणीत चारचाकी व दुचाकी गाड्या, सीमेंट, गाड्यांचे सुटे भाग, टायर्स, विमाने, हेलिकॉप्टर्स, हवाई वाहतुकीशी संबंधित सुटे भाग, तंबाखू, सिगारेट व पान मसाला यांचा समावेश आहे.