तृतीय पंथी विद्यार्थ्यांना IGNOU देणार मोफत शिक्षण
By admin | Published: July 4, 2017 12:29 PM2017-07-04T12:29:34+5:302017-07-04T12:29:34+5:30
तृतीय पंथी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मोफत शिक्षण देणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 4- तृतीय पंथी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मोफत शिक्षण देणार आहे. तृतीय पंथी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा तसंच उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना मार्ग मोकळा व्हावा, यासाठी "इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने देशातील सगळ्या तृतीय पंथी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. या निर्णयानुसार देशभरात असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या सर्व केंद्रांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे.
तृतीय पंथियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी आम्ही काही तृतीय पंथी कार्यकर्त्यांची मदत घेतली आहे. किमान पाच जणांचं यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी नोंद करण्याचं आमचं ध्येय आहे, असं इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे लखनऊमधील विभागीय संचालक मनोरमा सिंह यांनी सांगितलं आहे. या जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्टिफिकेट अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जुलै असून इतर अभ्यासक्रमांसाठी ती ३१ जुलै अशी आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार, कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये तृतीय पंथी विद्यार्थ्यांसाठी क्वचितच पूर्ण वेळ बॅचलर कोर्स असतात. प्रवेश अर्जात जरी तृतीय पंथींसाठी वेगळी कॅटेगरी असली तरीही कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नाही. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जे तृतीय पंथी विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतील त्यांना प्रवेशासाठी कोणतंही ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा स्थलांतराचं सर्टिफिकेट सादर करावं लागणार नाही. युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेताना त्यांची ओळख आधारकार्ड, राज्य किंवा केंद्र सरकारकडून दिलेलं एखाद प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडून दिलेल्या प्रमाणपत्रावर तपासली जाणार आहे.
"इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तृतीय पंथी विद्यार्थीसुद्धा त्यांना आवड असणाऱा कोर्स निवडू शकतात, तसंच त्यांना यासाठी युनिव्हर्सिटीकडून सर्वोतोपरी मदर केली जाइल, असं इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे लखनऊमधील विभागीय संचालक मनोरमा सिंह यांनी सांगितलं आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पर्यटन, व्यवस्थापन, शिक्षण अशा विविध विषयांमध्ये 228 अॅकेडमिक आणि प्रोफेशनल कोर्स चालतात.