IIT-BHU : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींसोबत भाजप आमदार; व्हायरल फोटोवर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 04:54 PM2024-09-01T16:54:22+5:302024-09-01T16:55:16+5:30
IIT-BHU News : गेल्यावर्षी वाराणसीतील IIT-BHU मध्ये बी टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या आरोपींना जामीन मिळाला आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींसोबत भाजप आमदाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
IIT-BHU Case Update : २२ ऑगस्ट २०२३ रोजी वाराणसीमधील आयआयटी बीएचयू मधील बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचे तीन सदस्यांना अटक करण्यात आली. आता तीन पैकी कुणाल पांडे आणि अभिषेक चौहान ऊर्फ आनंद या दोघांना उच्च न्यायालयाने जामीन मजूर केला आणि हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. यात आता भाजपच्या एका आमदाराचा दोन्ही आरोपींसोबतचा एक फोटोही व्हायरल झाला आहे.
आरोपींचे जल्लोषात स्वागत
उच्च न्यायालयात दोन आरोपींना जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल संताप व्यक्त होत आहे. विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. दोन्ही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
भाजप आमदाराचे आरोपींसोबत सेलिब्रेशन
जामिनावर सुटलेल्या आरोपींसोबत भाजप आमदार सौरभ श्रीवास्तव वाढदिवस साजरा करत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरूनही भाजपवर टीका होत आहे. फोटोमध्ये आमदार श्रीवास्तव हे आरोपी कुणाल पांडे आणि अभिषेक चौहानसोबत दिसत आहे. श्रीवास्तव हे अभिषेक चौहानच्या तोंडाला केक लावताना फोटोमध्ये दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोबद्दल आमदार श्रीवास्तव यांनी खुलासा केला आहे. आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "हा फोटो जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे. हा फोटो कोरोना काळातील आहे, हे दिसत आहे कारण मास्क दिसत आहे."
"कार्यकर्ता हा सदस्य असतो. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी केक कापावा लागला. तिन्ही आरोपींसोबत माझे आता कोणतेही संबंध नाहीत", असे श्रीवास्तव यांनी सांगितले.