2018पासून आयआयटी प्रवेश परीक्षा होणार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:44 AM2017-08-21T11:44:34+5:302017-08-21T11:48:29+5:30
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)च्या प्रवेश परीक्षा 2018पासून ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणार आहे.
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)च्या प्रवेश परीक्षा 2018पासून ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. हा निर्णय चेन्नईच्या जॉइंट अॅडमिशन बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. देशातील सर्व आयआयटी संस्थांमध्ये 2018पासून ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. त्याची सविस्तर माहिती जॉइंट अॅडमिशन बोर्ड देणार आहे.
प्रवेश परीक्षेत पारदर्शकता येण्यासोबतच पेपरफुटीसारखे प्रकार टाळण्यासाठी आयआयटीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तसेच ही प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. सध्याचे निकाल पाहता ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा घेणे सोयीस्कर होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याबाबतचा विचार सुरू होता, अखेर हा निर्णय घेण्यात आला असून तो योग्यच आहे, असं जॉइंट अॅडमिशन बोर्डाचे चेअरमन भारस्कर राममूर्ती यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 2018पासून जेईई (अॅडव्हान्स) परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
आयआयटीला जायचे आहे पण कोचिंगसाठी पैसे नाहीत. चिंता करू नका. तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांची सोय लवकरच होणार आहे. तुम्हाला आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी घरबसल्या शिकवणी मिळणार आहे. गरीब विद्यार्थ्यांनाही आयआयटीची दरवाजे खुली व्हावीत. त्यांच्यातील टॅलंट देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात यावे, या उद्देशातून केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय कामाला लागले आहे.
ठरल्याप्रमाणे सर्व नियोजन झालेच तर 2017 मध्ये होणा-या आयआयटी प्रवेश परीक्षेसाठीचे सर्व धडे तुम्हाला घरबसल्या मिळतील. या योजनेची घोषणा आगामी ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. जे विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी महागडे कोचिंग क्लास लाऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्रातर्फे ही योजना राबविली जाणार आहे. ही सर्व शिकवणी पूर्णत: मोफत असणार आहे. घरातील डीटीएचच्या माध्यमातून ही शिकवणी दिली जाईल, शिवाय प्राध्यापकांशी संवादही साधता येईल. तसेच अभ्यासासाठी इंटरनेटवर मोफत साहित्य पुरविले जाईल. या अभ्यासक्रमासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. केवळ शैक्षणिक साहित्यच पुरवण्यात येणार नाही, तर वारंवार परीक्षाही घेतल्या जातील. यातून अधिकाधिक तयारी करून घेतली जाईल. देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये हे शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे आव्हान या मंत्रलयासमोर आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून ते स्वीकारले जाईल.