आयआयटी फी झाली दोन लाख रुपये
By admin | Published: April 8, 2016 02:54 AM2016-04-08T02:54:33+5:302016-04-08T02:54:33+5:30
प्रतिष्ठित आयआयटींमधील शिक्षण आता चांगलेच महागले असले, तरी काही श्रेणींना सवलतींचा दिलासा मिळाला आहे. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी सध्या ९० हजार
नवी दिल्ली : प्रतिष्ठित आयआयटींमधील शिक्षण आता चांगलेच महागले असले, तरी काही श्रेणींना सवलतींचा दिलासा मिळाला आहे. सरकारने येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी सध्या ९० हजार रुपये असलेल्या शुल्कात भरमसाट म्हणजे, १२२
टक्के वाढ करताना ती फी दोन लाख रुपये केली आहे. अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग (भिन्नदृष्ट्या सक्षम), तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना फी पूर्णपणे माफ करीत मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालयाने अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग, तसेच वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. वार्षिक पाच लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना दोन-तृतीयांश शुल्क माफ केले जाणार असून, कोणत्याही श्रेणीत न बसणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. उच्चस्तरीय आयआयटी पॅनलने शुल्कवाढीचा ठेवलेला प्रस्ताव मान्य करीत सरकारने हा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)
जुन्या विद्यार्थ्यांसाठी आधीचीच शुल्करचना...
आयआयटींमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी वाढीचा दणका बसणार असला, तरी जुन्या विद्यार्थ्यांना या आधीच्याच शुल्करचनेनुसार फी द्यावी लागेल. आयआयटी रुरकीचे अध्यक्ष अशोक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पॅनलने गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत पुढील शैक्षणिक सत्रापासून ट्युशन फी सध्याच्या ९० हजार रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सर्व आयआटींबाबत धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या आयआयटी कौन्सिलच्या अध्यक्षपदी असलेल्या मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी
अंतिम निर्णय घेताना शुल्क दोन लाख रुपये केले. गेल्या वर्षीचा शुल्कात तीन पट वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता.