पंतप्रधानांच्या नावे मोफत लॅपटॉप योजना फसवी; आयआयटी इंजिनिअरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:36 AM2019-06-03T10:36:54+5:302019-06-03T10:37:27+5:30
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर सायबर सेलने राजस्थानच्या नागौरमधील पुडलोटा येथून दोघांना अटक केली आहे.
नवी दिल्ली : मेक इन इंडियाअंतर्गत वेबसाईट बनवून दोन कोटी तरुणांना मोफत लॅपटॉप देण्याची योजना फसवी निघाली असून आयआयटीचा इंजिनिअर राकेश जांगिड़ याला अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये त्याचा भाऊ निरंजन यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनी बनावट वेबसाईट बनवून त्यावर मेक इंन इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला होता.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर सायबर सेलने राजस्थानच्या नागौरमधील पुडलोटा येथून दोघांना अटक केली आहे. राकेश या वेबसाईटला लोकप्रिय करून त्याव्दारे पैसे कमवणार होता. तसेच या साईटवर रजिस्टर करणाऱ्या लोकांची माहिती विकण्याचाही राकेशचा कट होता.
23 वर्षीय राकेश नागौर हा 2019 च्या बॅचचा आयआयटी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. डीसीपी अन्वेश रॉय यांनी सांगितले की, तो एका हैदराबादच्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता. त्याने Modi_loptop.wishguruji.com या नावाने वेबसाईट बनविली होती. यामध्ये केंद्रामध्ये भाजपाची दुसरे सरकार आल्यास दोन कोटी तरुणांना मोफत लॅपटॉप वाटण्याचे आणि त्यासाठी अर्ज करण्याचे सांगितले होते.
पंतप्रधान मोदींचे नाव आणि मोफत लॅपटॉप मिळणाक या आशेपोटी दोन दिवसांत 15.2 लाख लोकांनी भेट दिली होती. तसेच 68000 क्लिकही मिळाले होते. या वेबसाईटच्या प्रचारासाठी त्याने इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि व्हॉट्सअॅपचा वापर केला होता.
अधिकाधीक लोकांना फसविण्यासाठी खोट्या योजनेचा प्रचार करण्यात आला. यामध्ये नंतर तीस लाख लोकांनी यशस्वीपणे अर्ज दाखल केले आहेत, आता तुमची वेळ आहे. अंतिम तारखेच्या आधी तुमचा अर्ज भरा, असे आवाहनही करण्यात आले होते.