आयआयटी कानपूरमध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांची गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 12:08 PM2018-04-19T12:08:32+5:302018-04-19T12:08:32+5:30
आयआयटी कानपूरच्या एका विद्यार्थ्याने गुरूवारी हॉस्टेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.
कानपूर- आयआयटी कानपूरच्या एका विद्यार्थ्याने गुरूवारी हॉस्टेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. भीम सिंह असं विद्यार्थ्याचं नाव असून तो गेल्या तीन वर्षापासून पीएचडीचा अभ्यास करतो आहे. भीम सिंह हा फिरोजाबादचा रहिवासी असून तो आयआयटी कानपूरमध्ये हॉस्टेल क्रमांक 8मध्ये राहत होता.
भीम सिंह काही दिवसांपासून तणावात होता, असं त्याच्याबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. पण भीमने आत्महत्या केल्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. मंगळवारी शेवटचं भीम सिंहला आयआयटीच्या आवारात पाहिलं होतं त्यानंतर तो दिसला नाही, असंही इतर विद्यार्थ्यांनी सांगितलं. वरिष्ठ पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे,
भीम सिंहच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट सापडली नाही. पण तो तणावात असल्याचं इतर विद्यार्थ्यांकडून समजलं. त्यामुळे आत्महत्या नेमकी का केली? याचं कारण समोर आलं नसल्याचं अखिलेश कुमार म्हणाले.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी भीम सिंह याच्या खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी भीम हा छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून इतर विद्यार्थ्यांचीही चौकशी केली जाते आहे.
कागदाचे तुकडे, लॅपटॉप व पेनड्राइव्ह घेतलं ताब्यात
पोलीस व फॉरेन्सिक विभागाला भीमच्या खोलीत कागदाचे लहान-लहान तुकडे आढळून आले. भीमने त्याच्या नोट्स व इतर कागद फाडून खोलीत फेकली असल्याचा अंदाज यावरून लावला जातो आहे. पोलिसांनी कागदाचे हे तुकडे ताब्यात घेतले आहेत. कागदाचे तुकडे जोडून ते वाचण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तसंच भीमचा लॅपटॉप, मोबाइल, पेनड्राइव्ह, डायरी व इतर कागदं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.