अबब... वार्षिक २ कोटी रुपये वेतन!; आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्याला ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 06:03 IST2021-12-13T06:03:42+5:302021-12-13T06:03:53+5:30
IIT Kharagpur Job Offer : खरगपूर येथील विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्यांच्या १६०० संधी चालून आल्या आहेत.

अबब... वार्षिक २ कोटी रुपये वेतन!; आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्याला ऑफर
खरगपूर : कोरोनामुळे लागलेला लॉकडाउन आणि त्यामुळे घसरणीला लागलेली अर्थव्यवस्था, या सर्व पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधी आटत चालल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, हे चित्र झपाट्याने बदलत असून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. पश्चिम बंगालमधील आयआयटी खरगपूर हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. खरगपूर येथील विद्यार्थ्यांना उत्तम नोकऱ्यांच्या १६०० संधी चालून आल्या आहेत. त्यातील एका विद्यार्थ्याला तर २ कोटी ४० लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाची ऑफर प्राप्त झाली आहे.
यंदा नोकरभरती मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आयआयटी खरगपूरमधील विद्यार्थ्यांना अवघ्या दहा दिवसांत इतक्या रोजगार संधी चालून आल्या आहेत. एका विद्यार्थ्याला २.४ कोटी रुपयांच्या वार्षिक वेतनाची, तर अन्य २२ विद्यार्थ्यांना वार्षिक ९० लाखांपासून पुढे वार्षिक वेतन मिळू शकणार आहे. नोकरभरती मोहिमेचा दुसरा टप्पा नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडणार आहे.
आठवडाभरात १५०० जणांना ऑफर्स
- आयआयटी खरगपूरने आयोजिलेल्या नोकरभरती मोहिमेच्या पहिल्या सात दिवसांत तेथील १५०० विद्यार्थ्यांना जगभरातील अग्रगण्य कंपन्यांनी नोकऱ्यांचे प्रस्ताव दिले. त्यानंतर आणखी १०० विद्यार्थ्यांना असे प्रस्ताव मिळाले.
- आयआयटी खरगपूरमधील करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे अध्यक्ष प्रा. ए. राजकुमार यांनी नोकरभरती मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे आभार मानले.
- गुगल, मायक्रोसॉफ्ट, मायक्राॅन टेेक्नॉलॉजी, उबेर, हनीवेल, एक्सेल अशा २४५ नामवंत कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
- सॉफ्टवेअर, हाय-लेव्हल कोडिंग, ॲनालिटिक्स, कन्सल्टिंग, कोअर इंजिनीअर कंपनी, बँकिंग, वित्तीय कंपन्या आदी क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे.