Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:07 AM2020-05-11T07:07:49+5:302020-05-11T07:13:35+5:30
हे नवीन मॉडेल नुकतेच देशात संक्रमणाचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्या तीनही मॉडेल्सच्या मदतीने तयार केले गेले आहे.
नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ६२ हजारांहून जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी देशातील अनेक संशोधन संस्था विविध तंत्रज्ञानावर काम करत आहेत. अशातच गुवाहाटीमधील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलसोबत संयुक्तरित्या देशातील पुढील ३० दिवसात कोरोना संक्रमण किती प्रमाणात वाढेल याचा अंदाज दिला आहे.
हे नवीन मॉडेल नुकतेच देशात संक्रमणाचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जाणार्या तीनही मॉडेल्सच्या मदतीने तयार केले गेले आहे. या मॉडेल अंतर्गत देशातील राज्ये तीन प्रकारात विभागली गेली आहेत. हे वर्गीकरण सध्याच्या रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनपेक्षा वेगळे आहे. त्याच्या संशोधनानुसार, येत्या ३० दिवसांत भारतात दीड लाख ते साडे पाच लाख कोरोनाग्रस्त आढळू शकतात. डेटा सायन्स मॉडेलवरून केलेल्या विश्लेषणानुसार ही आकडेवारी दीड लाखांपर्यंत गेली आहे. त्याचबरोबर लॉजिस्टिक पद्धतीने देशात साडे पाच लाख कोरोना रुग्णांची संख्या होऊ शकते.
आयआयटी गुवाहाटीचे सहाय्यक प्राध्यापक पलाश घोष म्हणाले की, कोणत्याही एका मॉडेलने केलेला अंदाज योग्य होणार नाही. हे लक्षात घेऊन आम्ही तिन्ही मॉडेल्स एकाच वेळी वापरली आहेत. यासह, या मॉडेलमध्ये फ्री डेली इन्फेक्शन रेटचा देखील प्रयोग केला आहे. रविवारी देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या २ हजार १०९ झाली आहे तर कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९ पर्यंत पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत १२८ लोकांचा मृत्यू झाला तर ३ हजार २७७ रुग्ण आढळले आहेत.
या संशोधनाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की कोणत्याही एका मॉडेलवर आधारित अहवाल आपल्याला दिशाभूल करू शकतो. त्यामुळे ही शक्यता दूर करण्यासाठी घातांकीय, लॉजिस्टिक आणि ससेप्टबल इन्फेक्शस ससेप्टबल (एसआयएस) मॉडेल वापरली गेली आहेत. याशिवाय ओपन सोर्स डेटाचा वापर करून रोज इन्फेक्शन रेट काढला जात आहे.