झाकिर नाईकच्या खात्यांमध्ये कोट्यवधींच्या अवैध देणग्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 04:58 AM2019-05-27T04:58:01+5:302019-05-27T04:58:06+5:30
दहशतवादासाठी भडकाविणारा इस्लामी धर्मगुरु झाकिर नाईक याच्या आणि त्याच्या संस्थांच्या बँक खात्यांमध्ये अनोळखी ‘शुभचिंतकांनी’ अनेक वर्षांपर्यंत कोट्यवधी रुपये भरले.
नवी दिल्ली : मुस्लिम युवकांना दहशतवादासाठी भडकाविणारा इस्लामी धर्मगुरु झाकिर नाईक याच्या आणि त्याच्या संस्थांच्या बँक खात्यांमध्ये अनोळखी ‘शुभचिंतकांनी’ अनेक वर्षांपर्यंत कोट्यवधी रुपये भरले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात ही बाब पुढे आली.
व्देषपूर्ण व्याख्याने देणाऱ्या नाईक याच्या चॅरिटी ट्रस्ट इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला (आयआरएफ)देणग्या आणि जकात स्वरुपात स्थानिक आणि परदेशी दात्यांकडून पैसा मिळाला.
संयुक्त अरब अमीरात (यूएई), सौदी अरब, बहरीन, कुवैत, ओमान आणि मलेशिया सह अनेक देशांमधून देणग्या मिळाल्या. ‘ईडी’च्या तपास अहवालात म्हटले आहे की, देणग्या जमा झाल्या, अशी आयआरएफची अनेक बँक खाती आहेत. त्यांचे नियंत्रण ५३ वर्षीय झाकिर अब्दुल करीब नाईक हाच करत असे. ही खाती सिटी बँक, डीसीबी बँक लिमिटेड आणि यूनियन बँक आॅफ इंडिया मध्ये आहेत. देणग्या स्थानिक व परदेशी नागरिकांकडून देणगी रोख स्वरुपात मिळाली आहे. त्यांची नावे पावत्यांवर ‘शुभचिंतक’ अशी आहेत. त्यामुळे बनावट नोंदींचा संशय निर्माण होतो.
२००३-४ ते २०१६-१७ दरम्यान आयआरएफच्या खात्यांमध्ये ६५ कोटी रुपये जमा झाले. या पैशांचा विनियोग शांती संमेलने, पगार देण्यासाठी केला गेला. नाईकच्या अध्यक्षतेखाली शांती संमेलन होत असे. त्यात तो भडकाविणारी भाषणे देत असे.