बेकायदेशीररित्या राहणा-या रोहिंग्यांना परत पाठवणे आवश्यकच - गृहराज्यमंत्री रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 12:48 AM2017-09-06T00:48:20+5:302017-09-06T03:29:02+5:30
भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई, दि. 6 - भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी रिजिजू यांनी जाहीर केली होती, तसेच जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याचे सांगितले होते.
बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देत आहोत असेही रिजिजू यांनी संसदेत सांगितले होते. त्यांच्या या वक्त्वचा मानवाधिकार संघटनांनी निषेध केला होता. हैदराबादेत राहणार्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी विनंती सरकारकडे केली होती. जर आम्ही परत म्यानमारला गेलो तर आमचे तुकडे केले जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. कायदेशीर बाबीमध्ये मला आता पडायचे नाही मात्र रोहिंग्या हे भारतात बेकायदेशीररित्या राहात आहेत, त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे.भारताने शक्य तितक्या स्थलांतरितांना सामावून घेतले आहे, आता बेकायदेशीर स्थलांतरितांना सामावून घेणे अशक्य आहे असे रिजिजू म्हणाले आहेत. म्यानमारमध्ये वांशिक तणाव उफाळला असतानाच आणि रोहिंग्यांसह हिंदू जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा म्यानमार दौरा सुरु आहे. त्यामुळे ते या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. लोकशाहीवादी नेत्या आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू ची या सत्तेत आल्यावर अल्पसंख्यांकांचे रक्षण करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी म्यानमारमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित पावले उचला अशी विनंती त्यांना केली आहे तर जगातील अनेक नेत्यांनी व संघटनांनी सू ची यांच्यावर टीकाही केली आहे.