कोळशासाठी प्रतिटन २५ रुपयांची अवैध वसुली; छत्तीसगढमध्ये ‘ईडी’ने टाकल्या धाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 05:43 AM2022-10-16T05:43:34+5:302022-10-16T05:44:19+5:30
ईडीने सुमारे ४.५ कोटी रुपये रोख व २ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
नवी दिल्ली : कोळसा वाहतुकीच्या परवान्यांसाठी एनओसी देण्याच्या बदल्यात बेकायदेशीरीत्या प्रतिटन २५ रुपयांची वसुली करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड करताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छत्तीसगढमध्ये धाडी टाकल्या असून, ३ जणांना अटक केली आहे. याप्रकरणी तेथील रायगडच्या जिल्हाधिकारी राणू साहू या बेपत्ता असून मुख्य सूत्रधार सूर्यकांत तिवारी हा फरार आहे. ईडीने सुमारे ४.५ कोटी रुपये रोख व २ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात राज्यातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक, राजकीय नेते आणि दलाल यांचा सहभाग असून सूर्यकांत तिवारी हा त्याचा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणी आधी आयकर विभागाने गुन्हा दाखल केला होता. नंतर ईडीने तपास हाती घेऊन ११ ऑक्टोबर रोजी छत्तीसगढमध्ये विविध ठिकाणी धाडी घातल्या. यातील एक आरोपी लक्ष्मीकांत तिवारी याच्याकडून १.५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. २००९च्या तुकडीचा आयएएस अधिकारी समीर विष्णोई आणि त्याच्या पत्नीकडे ४७ लाखांची रोख व ४ किलोचे सोन्याचे दागिने सापडले आहेत. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
असा केला घोटाळा
नियमानुसार, कोळसा खरेदीदारास प्रतिटन ५०० रुपये खाण कंपनीकडे जमा करावे लागतात. तसेच कोळसा ४५ दिवसांत उचलावा लागतो. एनओसीसाठी खनिकर्म अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात कोळसा खरेदीदारांची अडवणूक सुरू झाली. प्रतिटन २५ रुपये अनधिकृतरीत्या वसूल केले जाऊ लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"