“माझं काम झालं, अलविदा...”; स्टँडअप कॉमेडियन मनुव्वर फारुकीची भावूक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 04:23 PM2021-11-28T16:23:56+5:302021-11-28T16:24:48+5:30
या वर्षाच्या सुरुवातीस मध्य प्रदेशात एका कार्यक्रमात हिंदु देवी देवतांवर कथित वादग्रस्त टीप्पणी केल्यानं फारुकीला महिनभर जेलमध्ये जावं लागलं होतं
बंगळुरु – उजव्या विचारसरणीच्या लोकांनी धमकी दिल्यामुळे मागील २ महिन्यापासून कमीत कमी १२ शो रद्द केलेल्या कॉमेडियन मुनव्वर फारुकी(Standup Comedian Munawar Faruqui) ने यापुढे शो करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आजही बंगळुरुमध्ये मुनव्वर फारुकीचा नियोजित शो पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रद्द करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत पोलिसांनी आयोजकांना हा शो रद्द करण्यास सांगितले.
इतकचं नाही तर पोलिसांनी आयोजकांना पत्र लिहित फारुकी वादग्रस्त व्यक्ती असल्याचा उल्लेख केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीस मध्य प्रदेशात एका कार्यक्रमात हिंदु देवी देवतांवर कथित वादग्रस्त टीप्पणी केल्यानं फारुकीला महिनभर जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यानंतर हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर त्याला सोडण्यात आले. आज बंगळुरु येथील शो रद्द झाल्यानंतर मुनव्वर फारुकीने इन्स्टाग्राम पोस्ट लिहून द्वेष जिंकला, कलाकार हारला. माझं काम झालं, अलविदा असं म्हटलं आहे.
परंतु मुनव्वर फारुकीच्या चाहत्यांनी त्याला शो बंद करण्यापासून रोखलं आहे. संगीतकार मयूर जुमानी यांनी पोस्ट करत नको, तू शो बंद करू नको. आम्ही तुला असं करण्यास देणार नाही असं म्हटलं. तर आयोजक गुड शेफर्ड ऑडिटोरियममध्ये लिहिलेल्या पत्रात बंगळुरु पोलिसांनी फारुकी यांचा शो डोंगरी टू नोव्हेयर याचा उल्लेख केला आहे. तो एक वादग्रस्त व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलं. तर बंगळुरुत हिंदू जागरण समितीचे मोहन गौडा यांनी फारुकीचा शो आयोजित होऊ देणार नाही असा इशारा दिला होता.
फारुकीनं म्हटलंय की, बंगळुरु कार्यक्रमासाठी ६०० हून अधिक तिकीट विक्री झाली होती. परंतु आयोजकांना मिळालेल्या धमकीनंतर शो रद्द करण्यात आला. महिनाभरापूर्वी माझ्या टीमने दि. पुनीत राजकुमार सरांच्या संघटनेने चॅरिटीसाठी बोलावलं होतं. या शोच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येणार होते. चॅरिटीच्या नावावर पैसे जमा करायचे नाही असं ठरवलं होतं. एक मस्करी केली त्यासाठी मला जेलमध्ये पाठवलं परंतु मी कधीही शो रद्द केला नाही. यात काही समस्या नव्हती. या शोला धर्माच्या पुढे जात लोकांकडून प्रेम मिळालं. आमच्याकडे सेंसर सर्टिफिकेटही होतं. मागील २ महिन्यापासून १२ शो रद्द करण्यात आल्याचं फारुकीने सांगितले.
त्यापुढे फारुकीने सांगितले की, मला वाटतं माझा अंत आला आहे. माझं नाव मनुव्वर फारुकी आहे आणि ही माझी वेळ आहे. तुम्ही अद्भुत प्रेक्षक आहात. अलविदा, माझं काम झालं असं त्याने सांगितले आहे. NDTV च्या मुलाखतीत फारुकीने सांगितले होते की, एका शोमधून ड्रायव्हर, स्वयंसेवक आणि गार्डसह ८० जणांना रोजगार मिळतो. कदाचित मी चुकतोय असं मला कधी कधी वाटत होते. परंतु जे झालं त्यानंतर काही जण याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायेत हे मला समजलं असं फारुकीने म्हटलं आहे.