मी ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकलो आहे, मला वाचवा! तामिळनाडूतील मुलाचा हेल्पलाइनवर आला फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:30 AM2017-09-03T00:30:51+5:302017-09-03T06:30:15+5:30
ब्लू व्हेल या आॅनलाइन खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांची संख्या मोठी नसली तरी धोके लक्षात येऊ लागल्याने मुले त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली आहेत.
चेन्नई : ब्लू व्हेल या आॅनलाइन खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांची संख्या मोठी नसली तरी धोके लक्षात येऊ लागल्याने मुले त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. तामिळनाडूच्या तिरूपूर शहरातील १२ वर्षांच्या एका मुलाने राज्याच्या १0४ या हेल्पलाइन क्रमांकावर, आपण ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकलो आहोत, मला वाचवा, असा फोन केला.
मुलाने फोन करून, समुपदेशकाला सांगितले की, ते लोक मला आणि माझ्या कुटुंबीयांना मारून टाकतील. सुरुवातीला हा मुलगा फारशी माहिती द्यायला तयार नव्हता. मात्र आपण ब्लू व्हेल खेळत होतो, हे मान्य करून, त्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे, असे फोनवर सांगितले.
स्नेहा या आत्महत्या प्रतिबंधक केंद्राच्या संस्थापिका डॉ. लक्ष्मी विजयकुमार म्हणाल्या की, या धोकादायक खेळामुळे मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे या खेळात अडकलेली काही मुले त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागली आहेत. अनेक मुले या खेळातून बाहेर पडताना घाबरतात. खेळ सोडल्यास, त्यांचे आई-वडिल, बहिण वा भावाला मारण्यात येईल, अशी धमकी दिली जाते, हे त्याचे कारण आहे.
सुरुवातीला एक आव्हान म्हणून ब्लू व्हेल खेळण्यास सुरुवात करणारी मुले खेळाच्या एका विशिष्ट टप्प्यावर स्वत:चे आयुष्य संपवण्यास तयार होत असल्याने त्या खेळाच्या लिंक देऊ नयेत, असे केंद्र सरकारने आधीच संबंधितांना (फेसबुक, गूगल, व्हॉट्सअॅप आदी) सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
काय असते ब्ल्यू व्हेल चॅलेंज?
ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणाºयाला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.