“मी भगवान विष्णूचा कल्की अवतार, जर...”; माजी सरकारी कर्मचाऱ्याचा अजब दावा, जगाला दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:28 AM2021-07-05T10:28:31+5:302021-07-05T10:29:33+5:30
Rameshchandra Fefar: रमेशचंद्र फेफर हे जल संधारण विभागाच्या सरदार सरोवर येथे अभियंता म्हणून कार्यरत होते.
अहमदाबाद – गुजरात सरकारमधील माजी कर्मचारी रमेशचंद्र फेफर यांनी स्वत:ला श्री विष्णूचा शेवटचा कल्कीचा अवतार असल्याचा अजब दावा केला आहे. ग्रॅच्युटी रक्कम लवकरात लवकर जारी करावी अन्यथा माझ्या दिव्य शक्तींचा वापर करून या वर्षी जगात गंभीर दुष्काळ पाडू असं त्यांनी म्हटलं आहे. फेफर यांनी दैवी अवतार असल्याचा दावा करत अनेक दिवस कार्यालयात अनुपस्थित राहिले त्यानंतर सरकारने त्यांना वेळेआधीच सेवानिवृत्ती दिली आहे.
जल संधारण विभागाचे सचिव यांना १ जुलै रोजी पत्र लिहून रमेशचंद्र फेफर यांनी म्हटलंय की, सरकारमध्ये बसलेले राक्षस माझी १६ रुपये ग्रॅच्युटी आणि एक वर्षाचे वेतन १६ लाख रुपये थांबवून मला त्रस्त करत आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडून माझा छळ सुरू आहे. माझा असाच छळ केला तर या धरतीवर भीषण दुष्काळ पडू शकतो. कारण मी भगवान विष्णूचा दहावा अवतार आहे असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
रमेशचंद्र फेफर हे जल संधारण विभागाच्या सरदार सरोवर येथे अभियंता म्हणून कार्यरत होते. ८ महिन्यात केवळ १६ दिवस कार्यालयात आल्याप्रकरणी २०१८ मध्ये त्यांना विभागाकडून कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली होती. जल संधारण विभागाचे सचिव एम. के जाधव म्हणाले की, फेफर हे कार्यालयात येत नसतानाही पगाराची मागणी करत होते. मला फक्त पगार द्या कारण मी कल्की अवतार आहे. या धरतीवर पाऊस पाडण्याचं काम माझ्याकडे आहे असा दावा फेफर वारंवार करत असल्याचं सचिवांनी सांगितले.
तसेच फेफर हे मुर्खपणा करत आहेत. मला त्यांचे पत्र मिळाले. त्यात त्यांनी ग्रॅच्युटी आणि १ वर्षाच्या पगाराची मागणी केली आहे. फेफर यांच्या ग्रॅच्युटीचं प्रकरण प्रक्रियेत आहे. मागील वेळी त्यांनी कल्की अवतार असल्याचा दावा केला होता तेव्हा त्यांच्याविरोधात तपास सुरू केला होता. रमेशचंद्र फेफर यांची मानसिक स्थिती पाहता सरकारने त्यांना वेळेआधीच सेवानिवृत्ती दिली आहे.
फेफर यांनी पत्रात असाही दावा केला आहे की, कल्की अवतारात मी या धरतीवर असल्याने मागील २ वर्षात भारतात चांगला पाऊस पडला. देशात दुष्काळ पडला नाही. मागील २० वर्षात चांगल्या पावसामुळे भारताला २० लाख कोटींचा फायदा झाला. तरीही सरकारमध्ये बसलेले राक्षस मला त्रास देत आहेत. याच कारणाने यंदा संपूर्ण जगात भीषण दुष्काळ पडेल. मी सतयुगातही पृथ्वीवर शासन केले होते असा दावा त्यांनी पत्रातून केला आहे.